बीसीसीआयने सोमवारी न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली. टी२० विश्वचषक खेळणाऱ्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला टी२० संघाचा कर्णधार तर शिखर धवनला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर संघाला एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे.
या मालिकांमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू येथे खेळताना दिसतील. एकूण ३४ खेळाडूंना २ परदेश दौऱ्यांसाठी संघात स्थान मिळाले असून यादरम्यान ३ कर्णधार संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहेत. या कालावधीत संघ एक टी२०, दोन एकदिवसीय आणि एक कसोटी अशा एकूण ४ मालिका खेळणार आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात पांड्याकडे टी२० संघाची कमान सोपवली जाऊ शकते, पण शिखर धवनसारखा वरिष्ठ खेळाडू अजूनही संघात कायम आहे. पुढील वर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही तो संघाचा भाग असू शकतो.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या टी२० संघातील पहिली गोष्ट. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेतील बहुतांश वरिष्ठ खेळाडू संघात नाहीत. जसे विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, आर अश्विन, दिनेश कार्तिक, मोहम्मद शमी. मात्र या दौऱ्यावर वरिष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही जाणार आहे. या वर्षी सर्वाधिक टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारतीय खेळाडू आहे. एकदिवसीय संघाचे नेतृत्व धवनकडे असणार आहे.
त्याचबरोबर वेगवान गोलंदाज कुलदीप सेन आणि उमरान मलिक यांनाही स्थान मिळाले आहे. उमरानचाही टी२० संघात समावेश आहे. तो सातत्याने १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. अनेक दिग्गज त्याच्या विश्वचषक संघात समावेश करण्याच्या बाजूने होते.
टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू बांगलादेशमध्ये खेळतील
बांगलादेश दौऱ्यावर भारताला ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत. कसोटी संघाची धुरा ही रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवलाही कसोटी संघात स्थान मिळाले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्याने शेवटची कसोटी खेळली होती. मात्र, जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे या दौऱ्यातून बाहेर आहे. तो कधी तंदुरस्त होईल याबाबत अद्याप कुठलीही माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलेली नाही. कसोटी संघात वरिष्ठ वेगवान गोलंदाज उमेश यादवचाही समावेश आहे. भारताला या दौऱ्यात ३ एकदिवसीय सामनेही खेळायचे आहेत. या संघात रोहित, कोहली, धवन आणि राहुल दिसणार आहेत. याशिवाय रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी यांनाही संधी मिळाली आहे.