जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्कारावर बार्सिलोना आणि अर्जेटिनाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीची चार वर्षांपासून असलेली मक्तेदारी मोडून काढत पोर्तुगाल आणि रिअल माद्रिदच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने ‘बलॉन डी’ऑर’ पुरस्कारावर मोहोर उमटवली. फुटबॉलची प्रतिकृती असलेला सोन्याचा चषक उंचावताना रोनाल्डो भारावून गेला होता. दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावणाऱ्या रोनाल्डोला आपल्या अश्रूंवर नियंत्रण राखता आले नाही.
अर्जेटिनाचा जादूई फुटबॉलपटू मेस्सी आणि बायर्न म्युनिकला २०१३मध्ये अनेक जेतेपदे मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा फ्रान्सचा फ्रँक रिबरी यांच्यावर मात करून रोनाल्डोने २००८ नंतर हा पुरस्कार पटकावला. रोनाल्डोला २७.९९ टक्के मते मिळाली. मेस्सीला २४.७२ मते, तर रिबरीला २३.३६ मते मिळाली, असे फिफासह पुरस्काराचे संयोजन करणाऱ्या फ्रान्स फुटबॉल असोसिएशनने सांगितले.
झ्युरिक येथे सोमवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार विजेत्याची अधिकृत घोषणा होण्याआधीच रोनाल्डोला हा पुरस्कार मिळणार, हे उघड झाले होते. रोनाल्डो आपल्या सात कुटुंबीयांसह झ्युरिकमध्ये उपस्थित झाला असून त्याच्या रिअल माद्रिद क्लबने या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आपल्या संकेतस्थळावर दाखवण्याचे जाहीर केल्यानंतर रोनाल्डो हाच या पुरस्काराचा मानकरी असेल, अशी चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये होती. गेल्या मोसमात बायर्न म्युनिकला चॅम्पियन्स लीग, बुंडेसलिगा, जर्मन चषक तसेच युरोपीयन सुपर चषक आणि क्लब विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून देण्यात प्रमुख भूमिका निभावणारा फ्रँक रिबरी हा बलॉन डी’ऑर पुरस्काराच्या शर्यतीत आघाडीवर होता. मात्र आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, कर्णधार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मते नोंदवण्यासाठी वाढवण्यात आलेल्या दोन आठवडय़ांच्या कालावधीमुळे वाद निर्माण झाला होता. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात झालेल्या फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीत स्वीडनविरुद्ध सामन्यात त्याने झळकावलेल्या हॅट्ट्रिकमुळे पुरस्कारासाठी रोनाल्डोचे पारडे जड झाले आणि गेल्या मोसमात ५६ सामन्यांत ६६ गोल लगावणारा रोनाल्डोच जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला.
जर्मनीची गोलरक्षक नदिन अँगेरर हिने जगातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूसाठीचा बलॉन डी’ऑर पुरस्कार पटकवला. जर्मनीची प्रशिक्षक सिल्व्हिया नेद हिने सर्वोत्तम महिला प्रशिक्षकाच्या पुरस्कारावर नाव कोरले. कारकिर्दीत जगातील सर्वोत्तम पुरस्कारासाठी कधीच पात्र न ठरलेले ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांना विशेष बलॉन डी’ऑर पुरस्काराने सन्मानित आले. सर्वोत्तम गोलसाठीचा फेरेन्क पुस्कास पुरस्कार झ्लटान इब्राहिमोव्हिचने मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा