बेल्जियम, स्वित्झर्लड आणि जर्मनी या देशांनी पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केले आहे. युरोप गटातून नेदरलँड्स आणि इटलीपाठोपाठ आता जर्मनी, बेल्जियम आणि स्वित्र्झलड या देशांची भर पडली आहे.
या गटातून तब्बल १३ संघ फुटबॉलच्या महासोहळ्यासाठी पात्र ठरणार आहेत. त्यापैकी नऊ गटांतील विजेते थेट फिफा विश्वचषकासाठी स्थान मिळवतील. जर्मनी, बेल्जियम आणि स्वित्र्झलड या देशांनी एक सामना शिल्लक राखून आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावून फिफा विश्वचषकाच्या सोहळ्यासाठी स्थान पटकावले आहे. आता अन्य चार देशांचा फैसला लवकरच लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये होणाऱ्या प्ले-ऑफ सामन्यांनंतर चार संघ आगेकूच करतील.
अ गटातून अव्वल स्थान मिळवण्यासाठी आणि दुसऱ्या क्रमांकावरील क्रोएशियाला मागे टाकण्यासाठी बेल्जियमला एका गुणाची आवश्यकता होती. रोमेलू लुकाकू याने १५व्या आणि ३८व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे बेल्जियमने क्रोएशियाचा २-१ असा पराभव करून नऊ सामन्यांत २५ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली. स्वित्र्झलडने अल्बानिया संघाचा २-१ असा पराभव करून ई गटात २१ गुणांसह अव्वल स्थानी मजल मारली. झेर्डान शाकिरी (४८व्या मिनिटाला) आणि मायकेल लँग (७९व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल स्वित्र्झलडच्या विजयात मोलाचे ठरले. जर्मनीने आर्यलडचा ३-० असा धुव्वा उडवत सलग २३व्यांदा फिफा विश्वचषकात खेळण्याचा मान पटकावला. सॅमी खेडिरा (१२व्या मिनिटाला), आंद्रे स्करल (५८व्या मिनिटाला) आणि मेसूत ओझिल (९०व्या मिनिटाला) हे जर्मनीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पात्रता फेरीत अपराजित राहिलेल्या सात संघांपैकी जर्मनी, बेल्जियम आणि स्वित्र्झलड हे देश ठरले आहेत.
युरोप गटातील पात्रता फेरीची चुरस
* २०१४ विश्वचषकासाठी ३२ संघांचा समावेश
* युरोप गटातून १३ संघांना प्रवेश
* ५३ संघ अंतिम फेरीसाठी शर्यतीत
* सहा संघांचे आठ आणि पाच संघांचा एक गट
* नऊ गटातील अव्वल संघांना थेट प्रवेश
* दुसऱ्या क्रमांकांवरील आठ संघांमध्ये उर्वरित चार जागांसाठी पात्रता फेरीचे सामने
* आतापर्यंत नेदरलँड्स, इटली, बेल्जियम, स्वित्र्झलड आणि जर्मनी संघ पात्र
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2013 रोजी प्रकाशित
जर्मनी, बेल्जियम, स्वित्झर्लडला फिफा विश्वचषकाचे तिकीट!
बेल्जियम, स्वित्झर्लड आणि जर्मनी या देशांनी पुढील वर्षी ब्राझीलमध्ये होणाऱ्या फिफा विश्वचषक

First published on: 13-10-2013 at 05:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2014 fifa germany switzerland belgium gets ticket for fifa