काही वेळा खेळाडूंमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करण्याची आंतरिक क्षमता असते. मात्र मानसिक तंदुरुस्तीच्या अभावी हे खेळाडू यशाच्या शिखरापासून खूपच लांब राहतात. ग्रीसच्या खेळाडूंबाबत नेमके हेच म्हणता येईल. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचा जनक असलेल्या ग्रीसमध्ये फुटबॉलच्या नैपुण्याची कमतरता नाही. त्यांचे अनेक खेळाडू युरोपियन लीगमध्ये चमक दाखवतात. मात्र फिफा विश्वचषकाचा विचार केल्यास ग्रीसला अपेक्षेइतकी चमक अद्याप दाखवता आलेली नाही.
ग्रीसने यापूर्वी १९९४ व २०१०मध्ये या स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. १९९४मध्ये त्यांना मुख्य फेरीतील साखळी गटात १९९०चा उपविजेता अर्जेटिना, बल्गेरिया व नायजेरिया यांच्याबरोबर खेळावे लागले.
‘ग्रुप ऑफ डेथ’ अशी ख्याती मिळालेल्या या गटात ग्रीसला तिन्ही सामन्यांमध्ये लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे साखळी गटातच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. २०१०मध्ये ग्रीसने मुख्य फेरीत स्थान मिळविले. मात्र या स्पर्धेतही अर्जेटिना व नायजेरिया यांनी त्यांची पाठ सोडली नाही. बल्गेरियाऐवजी या वेळी ग्रीसला दक्षिण कोरिया यांचे आव्हान होते. सलामीच्या लढतीत ग्रीसला कोरियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मात्र जिगरबाज खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या ग्रीसने हाराकिरी मानली नाही. त्यांनी नायजेरियाविरुद्ध एक गोलने पिछाडीवर असतानाही जिद्दीने खेळ करत विजय मिळविला.
बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी त्यांना अर्जेटिनाविरुद्ध बरोबरीची आवश्यकता होती. ७७व्या मिनिटांपर्यंत त्यांनी गोलफलकाची पाटी कोरीच होती. मात्र शेवटच्या १५ मिनिटांमध्ये त्यांनी दोन गोल स्वीकारले आणि बाद फेरीचे दरवाजे बंद करून घेतले.
ग्रीस संघाने २००४मध्ये फुटबॉल समीक्षकांचे अंदाज चुकवत युरो चषक स्पर्धा जिंकून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. ओट्टो रेहागेल यांच्या मार्गदर्शनाखाली उतरलेल्या ग्रीसच्या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट सांघिक कौशल्य व गोल नोंदविण्याबाबत अचूकता दाखविली होती. हा अपवाद वगळता ग्रीसच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर अपेक्षेइतके अव्वल दर्जाचे यश मिळविलेले नाही.
जिगरेस कारागौनीस, अ‍ॅलेक्झांद्रोस त्झिओलिस, स्टीफानोस अथेनासिदिस, जिगरेस समारास, कोस्तास मिट्रोग्लोऊ यांच्यावर ग्रीसचे प्रशिक्षक सांतोस यांची मुख्य भिस्त आहे. खेळाडूंकडून विविध पद्धतीने व्यूहरचना करून घेण्यात ते माहीर मानले जातात.
बलस्थाने आणि कच्चे दुवे
शेवटपर्यंत जिद्दीने खेळ करण्याची क्षमता. उत्कृष्ट सांघिक कौशल्य दाखवत खेळ करण्याबाबत ख्यातनाम. भक्कम बचावफळी हा ग्रीस संघाचा मोठा आधार मानला जात आहे. पात्रता फेरीतील दहा सामन्यांमध्ये त्यांनी केवळ चारच गोल स्वीकारले आहेत. गोल नोंदविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अचूकतेचा अभाव. गोल करण्यासाठी संधी निर्माण करण्याबाबतही ग्रीसचे खेळाडू कमकुवत मानले जातात. संयमी खेळ करण्याचा अभाव.
अपेक्षित कामगिरी
ग्रीसला साखळीमध्ये ‘क’ गटात जपान, कोलंबिया, आयव्हरी कोस्टसारख्या तुल्यबळ संघांना सामोरे जावे लागणार आहे. फिफा क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या कोलंबियाने इंग्लंड, इटली, फ्रान्स, ब्राझील, अर्जेटिना आदी संघांना मागे टाकले आहे. त्यामुळे ग्रीसला बाद फेरीत स्थान मिळविण्यासाठी कोलंबिया व जपान यांच्याविरुद्धचे सामने किमान बरोबरीत ठेवणे आवश्यक आहे. आयव्हरी कोस्टविरुद्ध विजय मिळविताना ग्रीसला अडचण येऊ नये. हा सामना त्यांनी मोठय़ा फरकाने जिंकणे आवश्यक आहे.
* फिफा क्रमवारीतील स्थान : १०
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : ३ वेळा (२०१४ सह)
संभाव्य संघ
गोलरक्षक : अ‍ॅलेक्झांद्रोस झोरव्हास, पॅनाजिओतिस ग्लायकोस, मिचालीस सिफाकीस, स्टीफानोस केपिनो. बचाव फळी : ग्लॅनिस मानितिस, जिगरेस झेव्हेलास, कोस्टास मनोलास, अ‍ॅव्हेराम पापादोपौलोस, लुकास व्हिनेत्रा, होजे होबेलास, व्हॅसिलास तोरोसिदीस, दिमित्री सिओव्हास, निकोस स्पिरोपौलोस, सॉक्रेटिस फिटानिदिस. मधली फळी : जॉर्जस कारागौनीस, लाझारोस ख्रिस्तोदौलोपोलोस, आंद्रेस सामरीस, कोस्टास कास्तुरानीस, जिआनीस फेटात्झिदिस. आघाडीवीर : कोस्तास मिट्रोग्लोऊ, दिमित्री साल्पीनिंगदीस, दिमित्री पापादोपौलोस.

Story img Loader