सोफायने फेगोउली याने २४व्या मिनिटाला पेनल्टी-किकवर केलेल्या गोलमुळे अल्जेरिया संघ ३२ वर्षांनंतर विजय साकारेल, असे वाटले होते. पण बेल्जियमने अखेरच्या क्षणी केलेल्या दोन गोलमुळे अल्जेरियाचे विजय साकारण्याचे स्वप्न भंगले. मरौने फेलिआनी आणि ड्रायस मेर्टेन्स यांनी १० मिनिटांच्या अंतराने केलेल्या गोलमुळे बेल्जियमने अल्जेरियावर २-१ असा विजय मिळवला. बेल्जियमचा बचावपटू जॅन वेटरेनघेन याने गोलक्षेत्रात सफीर टायडर याला पाडल्याप्रकरणी अल्जेरियाला २४व्या मिनिटाला पेनल्टी-किक मिळाली. यावर फेगोउली याने बेल्जियमचा गोलरक्षक थिबाऊट कोर्टियसला चकवून उजव्या बाजून चेंडू गोलजाळ्यात ढकलला. अल्जेरियाचा हा २८ वर्षांनंतरचा पहिला गोल ठरला. पण बेल्जियमने दुसऱ्या सत्रात दोन गोल करून त्यांच्याकडून विजयाचा घास हिरावून घेतला. सामन्याच्या ७० व्या मिनिटाला मारोउन फेनाइनीने ‘हेडर’द्वारे अप्रतिम गोल करत बेल्जियमला पहिला गोल करून दिला. त्यानंतर १० मिनिटांनी पुन्हा एकदा बेल्जियमने अल्जेरियावर हल्ला चढवला आणि ड्रिएस मेरटेन्सने दुसरा गोल लगावत संघाल विजयी आघाडी मिळवून देत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.