फिफा विश्वचषकातील सर्वात यशस्वी आफ्रिकन संघ म्हणून कॅमेरूनचा उल्लेख केला जातो. किंबहुना त्यासाठीच कॅमेरूनला ‘अपराजित सिंह’ म्हटले जाते. पण आपल्या सातव्या विश्वचषकात ते या बिरुदाला जागतील का, यापुढे सध्या तरी प्रश्नचिन्हच आहे. आफ्रिकन विभागातील पाच देशांपैकी एक ठरण्याचा मान मिळवणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. कारण मागील चार वष्रे ही त्यांच्यासाठी मुळीच चांगली नव्हती. खेळाडूंमधील मतभेद आणि संघामधील अस्वस्थता याचा परिणाम त्यांच्या कामगिरीतून स्पष्टपणे दिसून येत होता. २०१०च्या विश्वचषकात कॅमेरून संघातील हीच दुफळी प्रकर्षांने दिसून आली. कर्णधार सॅम्युएल इटो या वादाच्या केंद्रस्थानी होता. इटो आपल्या संघसहकाऱ्यांवर सातत्याने आगपाखड करीत होता. संघातील खेळाडू आपल्याकडे चेंडू पास करीत नाहीत, या त्याच्या आरोपामुळे त्या वेळी वातावरण आणखी बिघडले होते. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून इटोने दोनदा निवृत्तीचा निर्णय घेतला. परंतु कॅमेरूनचे राष्ट्राध्यक्ष पॉल बिया यांच्या विनंतीमुळे त्याला दोन्ही वेळा आपला निर्णय बदलावा लागला. कॅमेरूनचा सर्वात यशस्वी माजी फुटबॉलपटू रॉजर मिलाच्या सांगण्यावरूनच बिया यांनी ही मनधरणी केली होती.
२०१२मध्ये आफ्रिकन अजिंक्यपद स्पध्रेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या कॅमेरूनसाठी वर्षभरात हीच नामुष्की पुन्हा ओढवली. पात्रता फेरीत केप वेर्दे नामक छोटय़ाशा राष्ट्राकडून कॅमेरूनचा संघ पराभूत झाल्यामुळे त्यांची इभ्रत गेली. पण त्यानंतर कॅमेरूनचे नशीब अनपेक्षितपणे पालटले. विश्वचषक पात्रता फेरीमध्ये टोगोने कॅमेरूनवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला होता. परंतु बंदी असलेल्या खेळाडूला संघात स्थान दिल्यामुळे फिफाने या सामन्याच्या विजयाचे तीन पूर्ण गुण कॅमेरूनला बहाल केले. त्यानंतर प्ले-ऑफमध्ये टय़ुनिशियाला धूळ चारून कॅमेरूनने फिफा विश्वचषकासाठी पात्र होण्याचा मान मिळवला. टय़ुनिशियाविरुद्धचा पहिला सामना गोलशून्य बरोबरीत सुटला, तर दुसऱ्या सामन्यात कॅमेरूनने ४-१ अशी दणदणीत विजयाची नोंद केली. या सामन्यात जीन मॅकॉनने दोन, तर पियरी वेबो आणि बेंजामिन मॉकांडजो यांनी प्रत्येकी एकेक गोलची नोंद केली.
१९८२मध्ये कॅमेरूनसाठी प्रथमच फिफा विश्वचषकाचे दरवाजे उघडले. पहिल्या फेरीतील तिन्ही सामने बरोबरीत सोडवूनही त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते. मग १९८४मध्ये विश्वचषकासाठी पात्र ठरू न शकलेल्या कॅमेरूनने १९९०मध्ये कमाल केली आणि उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र होण्याचा मान मिळवला. त्यामुळेच आफ्रिकन देशांचा फिफा विश्वषकातील टक्का वाढला. आफ्रिका खंडाला १९९४पासून तीन स्थाने तर १९९८पासून पाच स्थाने निश्चित करण्यात आली.
कॅमेरून संघाची प्रमुख मदार असेल ती ११५ सामन्यांत ५५ गोल नोंदवणाऱ्या आघाडीवीर कप्तान इटोवर. याचप्रमाणे मध्यरक्षक जीन मॅकॉन आणि बचावपटू निकोलस नकॉलो यांचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरेल. कॅमेरूनला जागतिक फुटबॉलच्या नकाशावर ओळख मिळवून दिली ९०च्या यशाने आणि रॉजर मिलाने. त्या वेळी गोल झळकावल्यावर जल्लोष साजरा करण्याच्या त्याच्या खास शैलीमुळे तो फुटबॉलरसिकांचे लक्ष वेधायचा. कॉर्नरच्या ध्वजापाशी जाऊन तो आपला नृत्याचा ठेका घ्यायचा. पण त्या यशाची कॅमेरूनला पुनरावृत्ती कधीही करता आली नाही. १९८८मध्ये विश्वचषक पात्रतेचा अडसर पार केल्याच्या आनंदात मिलाने आपली जर्सी स्टेडियममधील चाहत्यांमध्ये फेकली होती. ती त्या वेळी सहा वर्षीय इटोने झेलली होती. तोच इटो मिलाचा वारसा चालवून यंदा कॅमेरूनसाठी चमत्कार घडवेल, अशी साऱ्यांची अपेक्षा आहे.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
उत्तम तंदुरुस्ती आणि वेगवान खेळ ही वैशिष्टय़े जोपासणारा हा संघ एकास-एक अशी रणनीती मैदानावर आजमावण्यात पटाईत आहे. बचाव, मध्यरक्षण आणि आक्रमण याकडे गांभीर्याने लक्ष दिल्यामुळे कॅमेरूनला विश्वचषकात पात्र होता आले. चेल्सीकडून खेळणाऱ्या इटोचा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. याशिवाय अ‍ॅलेक्स साँग, इकोटो आणि मॉकांडजो यांच्यामुळे कॅमेरूनचा संघ मजबूत भासत आहे. सध्या कॅमेरून संघ मतभेदांच्या निखाऱ्यांवरून चालत आहे, हेच त्यांच्या अपयशाचे कारण ठरू शकतील. परंतु कॅमेरूनच्या संघाचा इटोवर असलेला भरवसा, हाच त्यांच्या अपयशाचे कारण ठरू शकेल. इटोकडे असामान्य गुणवत्ता असली तरी युवा खेळाडूंनी आक्रमणाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची आवश्यकता आहे.

अपेक्षित कामगिरी
व्होल्कर फिंके यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वचषकाचे स्वप्न पाहणाऱ्या कॅमेरूनसाठी अ-गटातील वाट नक्कीच सोपी नाही. जगज्जेतेदासाठी दावेदारी करणारा ब्राझीलचा संघ आरामात पहिल्या फेरीचा अडसर पार करेल. त्यामुळे अ-गटातून कोणता दुसरा संघ पात्र ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. आपल्या खास शैलीतील खेळाच्या बळावर दुसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी कॅमेरूनला क्रोएशिया आणि मेक्सिकोला ताकदीने टक्कर द्यावी लागेल.

संघ :
*  गोलरक्षक : गाय एन्डी, असेम्बे. बचावफळी : बेनोइट असोऊ-इकोट्टो, निकोलस नकॉलो, डॅनी नॉनके, हेन्री बेडीमो, ऑरेलीन चेडजो. मधली फळी : अ‍ॅलेक्स साँग, लँड्री, नग्युमो, जीन मॅकॉन, स्टीफने मबिया, इयाँग ईनॉह, जोएल मॅटिप. आघाडीवीर : सॅम्युएल इटो, मोहम्मदाऊ इड्रिसो, व्हिन्सेंट अबोबाकर, इरिक मॅक्सिम चॉपो-मोटिंग, पॅरी वेबो, बेंजामिन मॉकोंदजो.
*  स्टार खेळाडू : सॅम्युअल इटो, अ‍ॅलेक्स साँग, जीन मॅकॉन, स्टीफने मबिया, निकोलस नकॉलो, बेनोइट असोऊ-इकोट्टो, ऑरेलीन चेडजो.
*  प्रशिक्षक : व्होल्कर फिंके
*  व्यूहरचना : ४-२-३ -१

विश्वचषकातील कामगिरी
*  सहभाग : ७  वेळा (२०१४सह)
*  जेतेपद : अद्याप नाही
*  उपांत्यपूर्व फेरी : १ (१९९०)
*  फिफा क्रमवारीतील स्थान : ५०

Story img Loader