ज्या मैदानावर नेदरलँड्स आणि जर्मनीने अनुक्रमे स्पेन आणि पोर्तुगाल या बडय़ा संघांचा धुव्वा उडवला होता, त्याच साल्वाडोरच्या मैदानावर फ्रान्सने स्वित्र्झलडला ५-२ असा पराभवाचा धक्का देण्याची करामत केली. फ्रँक रिबरीच्या अनुपस्थितीत खेळताना पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करीत फ्रान्सने स्वित्र्झलडवर दणदणीत विजय मिळवत फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. मधली फळी, आघाडीवीर, बचावपटू अशा सर्वानीच गोल करीत फ्रान्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
स्वित्र्झलडने सर्वाधिक वेळ चेंडूवर ताबा मिळवला, पण गोल करण्याचे मोजकेच क्षण त्यांच्या वाटय़ाला आले. शेवटच्या १० मिनिटांत ब्लेरिम झेमाइली आणि ग्रेनिट झाका यांच्या गोलमुळे स्वित्र्झलडने दोन गोल लगावत बाजी मारली. स्वित्र्झलडने इक्वेडोरविरुद्धचा पहिला सामना जिंकला असला तरी अखेरच्या सामन्यात त्यांच्यासमोर होंडुरासचे आव्हान असणार आहे. हा सामना जिंकल्यास, त्यांचा बाद फेरीतील प्रवेश सुकर होईल. फ्रान्सने दोन सामन्यांत ६ गुण मिळवून ई गटात अव्वल स्थान पटकावले आहे. १९९८ मध्ये फ्रान्सने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर थेट विश्वचषकावरच नाव कोरले होते. आता तशाच कामगिरीची त्यांना अपेक्षा आहे. १९९२ नंतर फ्रान्सने स्वित्र्झलडकडून एकदाही पराभव पत्करलेला नाही.
युवा खेळाडूंचा भरणा असलेला स्वित्र्झलडचा संघ फ्रान्सपेक्षा अधिक वेग आणि ऊर्जा असतानाही छाप पाडू शकला नाही. फ्रान्सने पहिल्या सत्रातच ३-० अशी दमदार आघाडी घेतली होती. ऑलिव्हियर गिरौडने १७ व्या मिनिटालाच हेडरद्वारे पहिला गोल नोंदवला. त्यानंतर ६६ सेकंदांनी ब्लेस मतौडीने दुसरा गोल करून फ्रान्सला आघाडीवर आणले. पहिल्या सत्राचा खेळ संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना मॅथ्यू वाल्बुएना याने आणखी एका गोलाची भर घातली. फिफा विश्वचषकाच्या मुख्य फेरीतील फ्रान्सचा हा १०० वा गोल ठरला.
६६ व्या मिनिटाला स्वित्र्झलडच्या गोलक्षेत्रात करीम बेन्झेमाकडे चेंडू मिळाल्यानंतर त्याने स्वित्र्झलडचा गोलरक्षक दिएगो बेनाग्लिओला चकवून फ्रान्ससाठी चौथा गोल लगावला. मौसा सिस्सोकोने ७३ व्या मिनिटाला पाचवा गोल झळकावून फ्रान्सच्या विजयावर मोहोर उमटवली. अखेरच्या १० मिनिटांत स्वित्र्झलडने सुरेख आक्रमण करीत दोन गोल लगावले. सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना बेन्झेमा गोल करण्याच्या स्थितीत होता. फ्रान्ससाठी सहावा गोल नोंदवत त्याने जल्लोषही साजरा केला, पण त्याच्या ५-६ सेकंदआधी रेफरींनी सामना संपल्याची शिटी वाजवली होती. अखेर फ्रान्सला ५-२ अशा विजयावर समाधान मानावे लागले.

Story img Loader