तसे पाहिले तर दोन्हीही संघ तुल्यबळ.. घाना गेल्या वर्षीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा, तर जर्मनीचा संघ उपांत्य फेरीत मजल मारणारा.. घाना म्हणजे आफ्रिकन ‘डार्क हॉर्स’, तर जर्मनी युरोपातील दादा संघ (तीन जेतेपदे मिळवणारा).. पण विश्वचषकात ते जेव्हा आमने-सामने आले, तेव्हा चाहत्यांना एका थरारक सामन्याची अनुभूती घेता आली. घानाने झुंजार खेळ करत बलाढय़ जर्मनीला गोल करण्यासाठी झुंजवले. अखेर या दोन संघांमधील सामना २-२ असा बरोबरीत सुटला तो मिरोस्लाव्ह क्लोसच्या विक्रमी गोलमुळे. क्लोसने फिफा विश्वचषकातील १५वा गोल लगावत ब्राझीलचा महान खेळाडू रोनाल्डोच्या सर्वाधिक गोलांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. विशेष म्हणजे, रोनाल्डोने आपला १५वा गोल घानाविरुद्धच (२००६मध्ये) लगावला होता.
या सामन्यातील चारही गोल दुसऱ्या सत्रात झाले. मारिओ गोएट्झेने ५१व्या मिनिटाला जर्मनीसाठी खाते उघडल्यानंतर घानाने १० मिनिटांच्या अंतराने दोन गोल करत सामन्यात आघाडी मिळवली. अखेर मैदानावर उतरल्यापासून दोन मिनिटे झालेली नसतानाही क्लोसने जर्मनीसाठी बरोबरी साधणारा गोल केला. त्यानंतर दोन्ही संघांनी निर्णायक गोलसाठी प्रयत्न केले. अखेर सामना २-२ अशा बरोबरीत सुटला. ही लढत बरोबरीत सुटल्यामुळे अमेरिकेला बाद फेरीची संधी चालून आली आहे. पहिल्या सामन्यात घानावर विजय मिळवणाऱ्या अमेरिकेने पोर्तुगालला नमवल्यास ते बाद फेरीतील आपले स्थान निश्चित करतील.
विश्वासू क्लोस
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मारिओ गोएट्झेच्या गोलमुळे जर्मनीने आघाडी घेतल्यानंतर घानाच्या दोन गोलमुळे जर्मनी संघ पराभवाच्या छायेत सापडला होता. विश्वचषकातील दुसरा सामना गमावण्याचा इतिहास या वेळी पुसून काढायचा, या इराद्याने प्रशिक्षक जोकिम लो यांनी अनुभवी आघाडीवीर क्लोसला मैदानात उतरवले. दोन मिनिटांनीच त्याने गोल करून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला. ७१व्या मिनिटाला टॉनी क्रूसकडून मिळालेल्या क्रॉसवर बेनेडिक्ट होवेडेसने हेडरद्वारे चेंडूला गोलजाळ्यात धाडण्याचा प्रयत्न केला. चेंडू गोलजाळ्याच्या बाहेर जातोय, असे दिसत असतानाच क्लोसने झेप घेऊन उजव्या पायाने अलगदपणे चेंडू गोलजाळ्यात धाडला. सलग चौथ्या विश्वचषक स्पर्धेत गोल करण्याची किमया क्लोसने केली.
‘डार्क हॉर्स’ घाना
जर्मनीची बचावफळी कशी भेदायची, याचा संपूर्ण अभ्यास घानाने केला होता. त्याचप्रमाणे खेळ करत घानाने अनेक वेळा जर्मनीच्या गोलक्षेत्रात हल्ले केले. ५४व्या मिनिटाला त्यांना पहिले यश मिळाले. आंद्रे अयेवच्या या गोलमुळे घानाने बरोबरी साधली. त्यानंतर ६३व्या मिनिटाला कर्णधार असामोह ग्यानने अप्रतिम गोल करून घानाला आघाडीवर आणले.
जर्मनीच्या झुंजारवृत्तीने प्रशिक्षक प्रभावित
घानाविरुद्ध पिछाडीवरून मुसंडी मारणाऱ्या जर्मनी संघाच्या झुंजारवृत्तीमुळे प्रशिक्षक जोकिम लो प्रभावित झाले आहेत. ते म्हणाले, ‘‘फोर्टालेझामधील अतिउष्ण वातावरणात खेळाडूंनी ज्या प्रकारे जोमाने मुसंडी मारली, ते थक्क करणारे आहे. सामन्याच्या शेवटच्या क्षणी खेळाडू खूप दमले होते. त्यामुळे घानासारख्या चांगल्या संघाविरुद्ध गोल करण्याच्या सुरेख संधी निर्माण करूनही आम्हाला गोल लगावता आले नाहीत. जेरोन बोटेंग हा मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मध्यंतरालाच माघारी परतला. तसेच सामन्याच्या शेवटी एका झटापटीदरम्यान थॉमस म्युलरच्या चेहऱ्यातून रक्त वाहू लागले होते.’’ं
२० सामन्यांत १५ गोल
वाईट नाहीत -क्लोस
‘‘मी सुरुवातीपासून खेळलो काय किंवा मधूनच संधी मिळाली काय, माझ्यासाठी हे सर्व सामने महत्त्वाचे आहेत. विश्वचषकातील २० सामन्यांमध्ये १५ गोल ही वाईट कामगिरी नव्हे,’’ असे मिरोस्लाव्ह क्लोसने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा