इंग्लंड आणि इटली.. दोघेही एकमेकांना खुन्नस देणारे.. हमरीतुमरी करणारे.. एकमेकांसमोर उभे ठाकल्यावर जिंकण्याच्या ईर्षेने पेटून उठणारे आणि विजयासाठी जिवाचे रान करणारे.. शनिवारी जेव्हा हे दोन्ही देश विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भिडतील तेव्हा चुरशीच्या सामन्याचा निखळ आनंद चाहत्यांना मिळेल. आतापर्यंत विश्वचषकामध्ये इंग्लंडपुढे इटलीचाच बोलबाला राहिलेला आहे. विश्वचषकातील पाच सामन्यांपैकी त्यांनी तीन सामने जिंकले असून, एका सामन्यात बरोबरी आणि एका सामन्यात इटलीला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे विश्वचषकातील आकडेवारीमध्ये इटलीचा संघ सरस दिसत असला तरी पेटून उठलेला इंग्लंडचा संघ त्यांना कधीही धक्का देऊ शकतो.
इंग्लंडचा हुकमी एक्का म्हणजे वेन रूनी. आतापर्यंत रूनीने दमदार कामगिरी करत इंग्लंडला बरेच विजय मिळवून दिले असून या सामन्यातही इंग्लंडला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यासाठी तो सज्ज असेल. दुसरीकडे इटलीच्या संघामध्ये मारिओ बालोटेलीसारखा नावाजलेला आक्रमकपटू आहे, त्याचबरोबर गिआनलुईगी बफनसारखा नावाजलेला गोलरक्षक आणि कर्णधार आहे. त्यामुळे बफनच्या दांडग्या अनुभवाचा फायदा इटलीला होऊ शकतो.
२०१२च्या युरो चषक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते, तेव्हा हा सामना निर्धारित वेळेत ०-० असा बरोबरीत सुटला होता, पण पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीने ४-२ अशी बाजी मारली. काही फुटबॉलपंडितांच्या म्हणण्यानुसार, हा सामनाही बरोबरीत सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या सामन्याची थरारक अनुभूती चाहत्यांना मिळेल, अशी साऱ्यांनाच आशा आहे.
सामना क्र. 8
‘ब’ गट : इंग्लंड वि. इटली
स्थळ : अरेना अॅमाझोनिया, मानाऊस
लक्षवेधी खेळाडू
वेन रुनी (इंग्लंड) : इंग्लंडचा यंदाच्या विश्वचषकातील एकमेव स्टार फुटबॉलपटू म्हणजे वेन रुनी. आतापर्यंत रुनीने इंग्लंडसाठी बऱ्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली असून, सराव सामन्यांमध्येही त्याने दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे इंग्लंडला सर्वाधिक अपेक्षा नक्कीच रुनीकडून असतील. चपळ आणि आक्रमक खेळासाठी रुनी प्रसिद्ध असला, तरी त्याचा वेग काहीसा मंदावला असल्याचे म्हटले जात आहे. पण तरीही इटलीच्या रडारवर रुनी हा पहिल्या क्रमांकावर असेल.
मारिओ बालोटेली(इटली) : इटलीच्या संघातील अव्वल आक्रमणपटू अशी बिरुदावली मारिओ बालोटेली मिरवत असून, त्याचा खेळही जबरदस्त आक्रमक आहे. मारिओचे वय अवघे २३ वर्षे असले, तरी आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीमध्ये परिपक्वता पाहायला मिळाली आहे. २०१२च्या युरो चषकात त्याच्याकडून दमदार कामगिरी पाहायला मिळाली असून, तो इंग्लंडच्या संघाची मोठी डोकेदुखी ठरू शकतो.
व्यूहरचना
– वेन रूनी, इंग्लंड
-आंद्रिया पिलरे, इटली
आमने-सामने
सामने : ५
विजय : इटली ३, इंग्लंड १
बरोबरी : १