सुरक्षा हे विश्वचषकाच्या संयोजकांपुढील खडतर आव्हान असल्याचे जर्मनी-घाना सामन्याच्या वेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले. जर्मनी आणि घाना यांच्यातील लढतीदरम्यान नाझी समर्थकाने मैदानात घुसून व्यत्यय आणला. शर्टविरहित या नाझी समर्थकाच्या छातीवर एचएच आणि एसएस अर्थात ‘हिटलरचा उदोउदो’ आणि ‘नाझी पॅरामिलिटरी विभाग’ असे लिहिले होते. चाहत्यांच्या भेदभावविरोधी लढणाऱ्या ‘फेअर’ संस्थेने या घटनेसंदर्भात अहवाल तयार केला आहे. या कृतीचे कोणतेही स्पष्टीकरण नाही, असे ‘फेअर’ चळवळीचे मुख्य कार्यकारी संचालक पिअरा पोवर यांनी सांगितले.
पोलंडचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी या शर्टविरहित नाझी समर्थकाच्या पाठीवर लिहिला होता. घानाचा मध्यरक्षक सुली मुन्टारीने त्याला पकडले आणि सुरक्षारक्षकांच्या ताब्यात दिले. स्वत:च्या शरीरावर मजकूर लिहिणाऱ्या आणि धावत मैदानात आक्रमण करून नाझी विचारांचा प्रचार करणाऱ्या माथेफिरूला कसे रोखायचे, हा खरा प्रश्न आहे. विविध सामन्यांदरम्यान चेहऱ्याला गडद काळ्या रंगाचा मेकअप करणाऱ्या चाहत्यांना प्रवेश कसा मिळाला, यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
‘‘फिफाच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षांद्वारे या दोन्ही प्रकरणांची शहानिशा करण्यात येणार आहे. आम्ही या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. भेदभाव दर्शवणाऱ्या कोणत्याही चळवळीला आमचे समर्थन नाही. शिस्तपालन समिती शहानिशा करण्यासाठी पुराव्यांचा आधार घेते. तूर्तास तपास सुरू आहे,’’ असे फिफाचे प्रवक्त्या डेलिआ फिश्चर यांनी सांगितले. या प्रकरणी सामना अधिकारी इगर्ट मॅगन्युसॉन यांचा अहवालही निर्णय घेताना विचारात घेतला जाणार आहे.