विश्वचषक म्हणजे क्रिकेटविश्वाचा मानबिंदू. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे यजमानपद असलेल्या २०१५ विश्वचषकाचा कार्यक्रम आयसीसीने जाहीर केला. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात ख्राईस्टचर्च येथील लढतीने स्पर्धेचा नारळ फुटणार आहे. १४ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामधील मुकाबला रंगणार आहे. २९ मार्च, रविवारी या विश्वचषकाचा अंतिम मुकाबला रंगणार आहे.
मेलबर्न आणि वेलिंग्टन या दोन्ही ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात आयसीसीने या कार्यक्रमाची घोषणा केली. १९९२ नंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला विश्वचषक यजमानपदाचा मान मिळणार आहे.
गतविजेता भारतीय संघाचा सलामीचा सामना १५ फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या पाच विश्वचषकांत भारताने पाकिस्तानविरुद्धची लढत गमावलेली नाही. यामुळे पाकिस्तानवर मात करत दणक्यात सलामी देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल.
‘ब’ गटात असणाऱ्या भारताची दुसरी लढत २२ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत दाखल होणाऱ्या संघाशी भारताची लढत २८ फेब्रुवारीला असणार आहे. ६ मार्चला भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाशी दोन हात करणार आहे. २०११ विश्वचषकात बडय़ा संघांना पराभवाचा धक्का देणाऱ्या आर्यलडचे आव्हान १० मार्चला भारतीय संघासमोर असणार आहे. साखळी गटात भारताची शेवटची लढत झिंबाब्वेशी होणार आहे.
अ आणि ब गटांत प्रत्येकी सात संघ असून, साखळी लढतींनंतर प्रत्येक गटातील अव्वल चार संघ बादफेरीत आगेकूच करतील. उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम अशा बादफेरीच्या प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
४४ दिवसांच्या या स्पर्धेत साखळी, उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम लढत मिळून एकूण ४९ सामने खेळवण्यात येणार आहेत. विश्वचषकातील २६ सामने ऑस्ट्रेलियात, तर २३ लढती न्यूझीलंडमध्ये रंगणार आहेत. अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, कॅनबेरा, होबार्ट, मेलबर्न, पर्थ, सिडनी या ऑस्ट्रेलियातील, तर ऑकलंड, ख्राईस्टचर्च, डय़ुनेडिन, हॅमिल्टन, नेपिअर, नेल्सन, वेलिंग्टन या ठिकाणांना विश्वचषकाचे सामने आयोजित करण्याची संधी मिळणार आहे.
३१ डिसेंबर २०१२ रोजी आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल १४ संघ विश्वचषकात सहभागी होतील. यामध्ये १० कायमस्वरूपी, तर ४ पात्रता स्पर्धेचा अडथळा पार करून मुख्य फेरीत दाखल झालेल्या संघांचा समावेश असणार आहे.
‘‘आयसीसी क्रिकेट विश्वचषक ही एकदिवसीय प्रकारांतील सर्वोत्तम स्पर्धा आहे. पहिला विश्वचषक १९७५ मध्ये आयोजित करण्यात आला होता. २०१५ विश्वचषकासह विश्वचषकाचा ४० वर्षांचा टप्पा गाठला जाणार आहे. अनेक रंगतदार सामने, अविस्मरणीय खेळी यांचा साक्षीदार असलेला हा प्रवास संस्मरणीय आहे,’’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले.

विश्वचषकातील गट पुढील प्रमाणे
‘अ’  गट
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड,
क्वालिफायर संघ २, क्वालिफायर संघ ३

‘ब’ गट
भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, झिम्माब्वे, आर्यलड, क्वालिफायर ४

 

Story img Loader