|| गौरव जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडमध्ये रविवारी क्रीडाप्रेमींसाठी मनोरंजनाची दुहेरी पर्वणी होती. स्टेडियमबाहेरील गर्दी, ‘बार्मी आर्मी’ची वैविध्यपूर्ण गाणी आणि उपस्थित भारतीय तसेच इंग्लंड चाहत्यांचा सळसळता उत्साह यामुळे यजमान इंग्लंडसाठी हा दिवस एकप्रकारे आनंदचा सोहळा ठरला.

सेंट जॉन्स वूड या स्थानकावर शनिवारी सायंकाळीपासूनच उद्या अंतिम फेरी रंगणार आहे, अशी ठराविक वेळाने घोषणा करण्यात येत होती. या स्थानकापासून लॉर्ड्स स्टेडियम काही मीटरच्या अंतरावर असल्याने चाहत्यांनी प्रवासासाठी लवकरच घराबाहेर पडावे, असेही वर्तवण्यात येत होते. परंतु मुख्यत: सामन्याच्या दिवशी या स्थानकाजवळ फारशी गर्दी दिसत नव्हती. त्यामुळे विश्वचषकाच्या अंतिम फेरीचे ज्या प्रकारे वातावरण तयार करण्यात आला होते, ते प्रत्यक्षात दिसले नाही. इंग्लंडचे चाहते मोठय़ा प्रमाणावर असले तरी भारत स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे स्टेडियमधील एक-दोन स्टँड बऱ्यापैकी रिकामेसुद्धा दिसत होते.

स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांपैकी ६०-७० टक्के चाहते हे भारतीय होते. काही चाहते भारताचेच टी-शर्ट्स आणि झेंडे घेऊन न्यूझीलंडच्या संघाला पाठिंबा दर्शवत होते, तर एका चाहत्याने भारताच्या झेंडय़ामागे इंग्लंडचा झेंडा चिकटवून यजमानांचे प्रोत्साहन वाढवले. सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियमबाहेर ‘इंग्लंड तिकीट प्लीज’ असा फलक घेऊन बरेच चाहते दिसले. यामधील एक चाहता न्यूझीलंडमधून आला होता. परंतु सामना सुरू होऊन अर्धा तास उलटला तरी त्याला तिकीट न मिळाल्यामुळे तो माघारी परतला. न्यूझीलंडची आणखी असेच १५-२० चाहते तिकीट नसतानाही स्टेडियमबाहेर घोळका करून होते. परंतु तिकीट मिळणे त्यांच्यासाठी अवघडच होते.

दुसरीकडे विम्बल्डनची अंतिम फेरी असली तरी रविवारी लॉर्ड्सवरच अधिक गर्दी दिसत होती. सामना सुरू झाल्यानंतर मात्र इंग्लंडच्या चाहत्यांच्या आवाजाला उधाण आले. येथे राहणाऱ्या भारतीय चाहत्यांनी इंग्लंडला पाठिंबा दर्शवला असला तरी अन्य देशांतून आलेल्या भारतीयांनी न्यूझीलंडने विश्वचषक उंचवावा, अशी इच्छा व्यक्त केली. अनेकांचे मन न्यूझीलंडलाच मत दर्शवत होते, परंतु बुद्धी इंग्लंड विजेता होईल, असे सांगत असल्याने सामन्यात मजा आली.

वयस्करांपासून ते लहान बालकांपर्यंत हा सामना पाहायला आले होते. त्यातील एक ८२ वर्षीय गृहस्थ यांनी सांगितले की, ‘‘या मैदानावर मी आजपर्यंत डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर यांसारख्या महान क्रिकेटपटूंना खेळताना पाहिले. परंतु आज जर इंग्लंडने विश्वचषक जिंकला तर आयुष्यात मी सुखाने शेवटचा श्वास घेऊ शकेन.’’

परंतु संपूर्ण विश्वचषकात न जाणवणारी एक गोष्ट आज प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे ‘बार्मी आर्मी’ची गाणी. त्यांनी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला नसेल, इतका कल्ला आज केला. त्यांनी प्रत्येक खेळाडूवर गाणे बनवून त्यामध्ये विश्वचषकाचा समावेश केला. त्यामुळे प्रत्येक गोलंदाज गोलंदाजीला आल्यावर स्टेडियममध्ये एकच सूर उमटायचा. त्यामुळे आज विश्वचषक कोणीही जिंकला तरी, इंग्लंडच्या खेळाडूंना व चाहत्यांना हा दिवस येणाऱ्या अनेक वर्षांसाठी नेहमीच स्मरणात राहिल!