U-19 Men’s World Cup 2024: पुरुषांच्या अंडर-१९ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. अंतिम सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. या कालावधीत एकूण ४१ सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ २० जानेवारीपासून येथे आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. सध्या टीम इंडिया दुबईमध्ये १९ वर्षाखालील आशिया चषकात खेळत आहेत. सुपर-६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला पाहायला मिळू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयसीसीने सोमवारी संध्याकाळी अंडर-१९ विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. यावेळी विश्वचषकात चार गट करण्यात आले आहेत. चारही गटात प्रत्येकी चार संघ ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक संघ त्यांच्या गटातील उर्वरित तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळेल. चारही गटांतील अव्वल ३ संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. म्हणजेच दुसऱ्या फेरीत एकूण १२ संघ असतील. येथे प्रत्येक संघ दुसऱ्या गटातील दोन संघांसह प्रत्येकी एक सामना खेळेल. म्हणजेच या फेरीत प्रत्येक संघाचे दोन सामने होतील. यानंतर सर्वोतम-४ संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

ग्रुप स्टेजमध्ये भारतीय संघ पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० जानेवारीला, दुसरा सामना २५ जानेवारीला आयर्लंडशी आणि तिसरा सामना २८ जानेवारीला अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. हे सर्व सामने येथील पाच मैदानांवर खेळवले जातील.

हेही वाचा: IND vs ENG: भारताविरुद्धच्या पाच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत

१९ वर्षाखालील विश्वचषक २०२४ मध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार असून हा विश्वचषक तीन टप्प्यात खेळवला जाणार आहे. अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे या देशांना विश्वचषकासाठी थेट प्रवेश मिळाला आहे. उर्वरित पाच संघ क्षेत्रीय पात्रता फेरीद्वारे निश्चित करण्यात आले. नामिबिया, न्यूझीलंड, नेपाळ, स्कॉटलंड आणि यूएसए यांना प्रादेशिक पात्रता फेरीतून प्रवेश मिळाला.

हेही वाचा: IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सची मोठी अपडेट, आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळणार ‘या’ स्वरुपात; जाणून घ्या

भारत हा अंडर-१९ विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे

१९८८ पासून अंडर-१९ वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. हे १९९८ पासून दर दुसऱ्या वर्षी आयोजित केले जाते. भारतीय संघ हा अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ मध्ये अंडर-१९ वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. याशिवाय २०१६ आणि २०२० मध्ये भारत उपविजेता ठरला आहे.

अंडर-१९ आशिया कपमध्ये उदय सहारन भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. १९ वर्षीय उदय सहारन हा राजस्थानचा रहिवासी खेळाडू असून मागील अंडर-१९ विश्वचषकादरम्यान त्याची स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. निवडकर्त्यांनी १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी तीन खेळाडूंची स्टँडबाय म्हणून निवड केली आहे. चार खेळाडू राखीव म्हणून राहतील.

अ गट : भारत, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका

ब गट: इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड

क गट: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया

ड गट : अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2024 icc u19 mens cricket world cup schedule announced see team indias complete schedule here avw