करोना साथीचे गंभीर परिणाम केंद्र सरकारच्या राष्ट्रीय क्रीडा अर्थसंकल्पात सोमवारी पाहायला मिळाले. २०२१-२२च्या आर्थिक वर्षांसाठीच्या क्रीडा क्षेत्रासाठी २३०.७८ कोटी रुपयांची कपात करून केवळ २५९६.१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.. त्यामुळे ‘असेन मी, नसेन मी । तरी असेल गीत हे॥’ या शान्ता शेळके यांच्या काव्यपंक्तींतून बोध घेऊन, सुविधा नसल्या तरी खेळ जपण्याचे आव्हान खेळाडू आणि क्रीडा संघटकांसमोर आहे.

चालू वर्षांसाठी सरकारने क्रीडा क्षेत्रासाठी २८२६.९२ कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु करोना साथीमुळे बऱ्याचशा क्रीडा स्पर्धावर परिणाम झाल्याने १८००.१५ कोटी रुपये अशी सुधारित तरतूद जाहीर करण्यात आली. या सुधारित रकमेपेक्षा आगामी आर्थिक वर्षांसाठी ७९५.९९ कोटी रुपयांची अधिक तरतूद करण्यात आली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा लांबणीवर पडली. जवळपास सर्वच क्रीडा प्रकारांमधील देशांतर्गत क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या. भारताच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडापटूंचे परदेशी प्रशिक्षण आणि स्पर्धा कमी झाल्या अशा अनेक बाबींमुळे चालू वर्षीच्या खर्चात कपात झाली. ऑलिम्पिकमधील सहभागासह सर्व तयारीचा आर्थिक भार क्रीडा मंत्रालय उचलत असते.

‘‘गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सुरुवातीला २८२६.९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली

होती. परंतु नंतर सुधारित अर्थसंकल्पात हा आकडा १८००.१५ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला. कारण करोना साथीमुळे देशभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या होत्या,’’ अशी माहिती क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाला दिलासा

मागील अर्थसंकल्पात भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) पदरी निराशा पडली होती. कारण त्यांच्या रकमेत कपात करून फक्त ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र २०२१-२२च्या अर्थसंकल्पात ‘साइ’ला दिलासा मिळाला आहे. त्यांच्या अनुदानात १६०.४१ कोटी रुपयांची वाढ करून एकूण ६६०.४१ कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले आहे.

खेलो इंडियाच्या खर्चातही मोठी घट

केंद्रीय क्रीडा खात्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम मानल्या जाणाऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या खर्चाच्या तरतुदीतही २३१.७१ कोटी इतकी मोठी घट झाली आहे. मागील अर्थसंकल्पात खेलो इंडिया स्पर्धेसाठी ८९०.४१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र ताज्या अर्थसंकल्पात फक्त ६५७.४२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पातील क्रीडा तरतुदी

*  क्रीडापटूंच्या भत्त्यांवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. मागील अर्थसंकल्पात ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र आता हा आकडा ५३ कोटी रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

*  क्रीडापटूंच्या राष्ट्रीय निधीसाठी गतवर्षीप्रमाणेच दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

*  मागील अर्थसंकल्पात राष्ट्रीय क्रीडा संघटनांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र यंदा ३५ कोटी रुपयांनी वाढ करून २८० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत.

*  राष्ट्रीय क्रीडा विकास निधीसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

* जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेसाठीच्या (वाडा) आर्थिक योगदानात ५० लाखांनी वाढ करण्यात आली आहे. मागील अर्थसंकल्पात दोन कोटींऐवजी यंदा अडीच कोटींची तरतूद केली आहे.

*  २०१०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ‘साइ’ स्टॅडियाच्या नूतनीकरणासाठी गतवर्षी ७५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या वेळी ती ३० कोटी करण्यात आली आहे.

*  जम्मू आणि काश्मीरमधील क्रीडा सुविधांसाठी गतवर्षीप्रमाणे ५० कोटींची तरतूद केली आहे.

*  राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेसाठी ५५ कोटी रुपयांचे अनुदान कायम ठेवण्यात आले आहे.

Story img Loader