Yashtika Acharya Gym Accident: राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील एका तरुण खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्रीडाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. राष्ट्रीय खेळात सुवर्णपदक विजेती पॉवरलिफ्टर यष्टिका आचार्य (१७) जिममध्ये सराव करत असताना तिच्या मानेवर २७० किलोचा रॉड पडला. या अपघातात यष्टिकाचा जागेवरच मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी घडली. स्थानिक जिममध्ये यष्टिका आपल्या ट्रेनरच्या देखरेखीखाली वेटलिफ्टिंगचा सराव करत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉवरलिफ्टिंगच्या सेशनमध्ये यष्टिका २७० किलो वजन उचलण्याचा सराव करत होती. यावेळी तिचा तोल गेल्यामुळे रॉड अचानक मानेवर पडला आणि एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. काही सेकंदात मान तुटल्यामुळे यष्टिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. यष्टिकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे तिला मृत घोषित केले. या अपघातात ट्रेनरलाही दुखापत झाल्याचे सांगितले जाते.

क्रीडा वर्तुळाला बसला धक्का

यष्टिका आचार्यने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत यशाच्या पायऱ्या चढल्या होत्या. पॉवरलिफ्टिंगच्या प्रकारात ती भारताचे भविष्य मानले जात होती. तिचा अशाप्रकारे अचानक मृत्यू झाल्यामुळे खेळाडूंमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. यानंतर आता पॉवरलिफ्टिंग आणि इतर वजन उचलण्याच्या खेळांमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

जिममध्ये उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, यष्टिका वजन उचलण्याचा सराव करत होती. तिने आधी एक, दोन, तीन… असे म्हटले आणि वजन उचलले. मात्र अचानक तिचा हात सटकला आणि संतुलन बिघडल्यामुळे संपुर्ण वजन रॉडसह तिच्या मानेवर पडले. यष्टिका त्याला सांभाळू शकली नाही आणि खाली पडली.

राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये जिंकले सुवर्ण पदक

काही काळापूर्वी गोव्यात आयोजित केलेल्या ३३ व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये इक्विप्ड श्रेणीत सुवर्ण पदक आणि क्लासिक श्रेणीत रौप्य पदक जिंकले होते.

यष्टिकाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळेच अपघाताबद्दल एफआयआर दाखल झालेला नाही. पोलिसांनी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला.