इस्तंबूल, माद्रिद व टोकियो या तीन शहरांनी २०२० च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजनपदासाठी प्रस्ताव पाठविला आहे. आणखी आठ महिन्यांनी संयोजनपदासाठी निवडणूक होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) प्रवक्त्याने ही माहिती दिली. या तीनही शहरांनी यापूर्वीच्या ऑलिम्पिककरिता संयोजनपदाचे प्रस्ताव सादर केले होते मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नव्हते.
माद्रिदने सलग तिसऱ्यांदा प्रस्ताव दिला आहे, तर टोकियोने दुसऱ्यांदा अर्ज सादर केला आहे. इस्तंबूलने आतापर्यंत पाच वेळा संयोजनासाठी अर्ज दिला होता.
संयोजनपदासाठी प्रस्ताव सादर करताना स्पर्धेची वेगवेगळी ठिकाणे, आर्थिक अंदाजपत्रक, सुरक्षा व्यवस्था, खेळाडू व तांत्रिक अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था, वाहतूक व्यवस्था आदी माहिती द्यावी लागते. आयओसीच्या स्पर्धा संयोजन समितीचे मुख्य क्रेग रिडी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे सदस्य या तीनही शहरांना मार्च महिन्यात भेट देतील व तेथील संयोजकांबरोबर सविस्तर चर्चा करतील. त्यांच्या या भेटीच्या आधारे तयार झालेला अहवाल आयओसीकडे पाठविला जाईल.
युनोस आयर्स येथे ७ सप्टेंबर रोजी २०२० च्या संयोजनपदासाठी गुप्त मतदान घेतले जाईल.
या तीन शहरांखेरीज रोम शहराचाही प्रस्ताव आला होता मात्र इटलीच्या शासनाने या स्पर्धेस आर्थिक सहकार्य करण्यास सपशेल नकार दिल्यामुळे रोम शहराने माघार घेतली.
दोहा, कतार, बाकू या शहरांना आयओसीनेच गतवर्षी संयोजनपदाच्या संभाव्य शहरांच्या यादीतून वगळले होते.
माद्रिद शहरातर्फे महापौर अॅना बोटेला व इस्तंबूलतर्फे कादिर तोपबास यांनी समारंभपूर्वक संयोजनपदाचे प्रस्ताव आयओसीकडे सादर केले. टोकियो शहराच्या वतीने ख्यातनाम महिला फुटबॉलपटू होमारे सावा हिने प्रस्ताव दिला.
२०२० च्या ऑलिम्पिक संयोजनासाठी इस्तंबूल, माद्रिद, टोकियो शर्यतीत
इस्तंबूल, माद्रिद व टोकियो या तीन शहरांनी २०२० च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजनपदासाठी प्रस्ताव पाठविला आहे. आणखी आठ महिन्यांनी संयोजनपदासाठी निवडणूक होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) प्रवक्त्याने ही माहिती दिली.
First published on: 09-01-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 bid cities submit 2020 olympic files to ioc