एक गोलाने पिछाडीवर पडल्यानंतरही लिओनेल मेस्सीच्या दोन गोलांच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत ग्रेनडाचा २-१ असा पराभव केला. मेस्सीने या सामन्यात बार्सिलोनातर्फे ३००वा गोल झळकवण्याची करामत केली. या विजयामुळे बार्सिलोनाने गुणतालिकेत ६५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.
ऑडियन इघालो याने २६व्या मिनिटाला गोल करून ग्रेनडाला आघाडीवर आणले. कालरेस अरांडाच्या सुरेख क्रॉसवर गुलेर्मे सिक्वेराला नियंत्रण मिळवण्यात यश आले नसले तरी इघालोने ही संधी वाया घालवली नाही. इघालोने मोकळ्या मिळालेल्या गोलजाळ्यात पाच यार्डावरून चेंडू अलगदपणे गोलजाळ्यात ढकलला. पण दुसऱ्या सत्राला सुरुवात झाल्याच्या पाच मिनिटांनंतर मेस्सीने बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. सेस्क फॅब्रेगसच्या फटक्यावर ग्रेनडाचा गोलरक्षक टोनो याला चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्याचा फायदा उठवत मेस्सीने हा गोल लगावला. ७३व्या मिनिटाला मेस्सीने बार्सिलोनातर्फे ३०१व्या गोलाची नोंद केली. फ्री-किकवर मेस्सीने हा गोल साकारला. अन्य सामन्यात, गेटाफेने सेल्टा संघावर ३-१ असा विजय मिळवला. सेव्हिलाने डेपोर्टिव्होचे आव्हान ३-१ असे परतवून लावले.
दरम्यान, ब्लॅकबर्न रोव्हर्सकडून ०-१ असे पराभूत व्हावे लागल्याने बलाढय़ अर्सेनलचे एफए चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या विजयासह ब्लॅकबर्न रोव्हर्सने मात्र उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली. मंगळवारी चॅम्पियन्स लीगच्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत होणाऱ्या बायर्न म्युनिचविरुद्धच्या सामन्यासाठी अर्सेनलला या सामन्यात विजयाची आवश्यकता होती. मात्र पराभवामुळे त्यांचे मनोधैर्य खच्ची झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Feb 2013 रोजी प्रकाशित
मेस्सीचा ३०० वा गोल
एक गोलाने पिछाडीवर पडल्यानंतरही लिओनेल मेस्सीच्या दोन गोलांच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत ग्रेनडाचा २-१ असा पराभव केला. मेस्सीने या सामन्यात बार्सिलोनातर्फे ३००वा गोल झळकवण्याची करामत केली.
First published on: 18-02-2013 at 03:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 300th goal by messi