वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने ३८७ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुलची शतकं आणि मधल्या फळीत ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरने फटकेबाजी करुन दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात आपलं वर्चस्व गाजवलं. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत जोडीने फटकेबाजी सुरु ठेवत धावांचा ओघ सुरुच ठेवला.
वन-डे क्रिकेटमध्ये खेळत असताना भारताकडून एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर जोडीच्या नावावर जमा झाला आहे. रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर दोन्ही फलंदाजांनी ३१ धावा कुटल्या. सचिन आणि अजय जाडेजा यांच्या जोडीने १९९९ साली हैदराबादच्या मैदानावर २८ धावा काढल्या होत्या. यानंतर तब्बल २० वर्ष अबाधित असलेला विक्रम आता पंत-अय्यर जोडीच्या नावे जमा झाला आहे.
वन-डे क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा काढणारी भारतीय जोडी –
- श्रेयस अय्यर – ऋषभ पंत : ३१ धावा विरुद्ध वेस्ट इंडिज – (गोलंदाज रोस्टन चेस, २०१९)
- सचिन तेंडुलकर – अजय जाडेजा : २८ धावा विरुद्ध न्यूझीलंड – (गोलंदाज सी. ड्रम, १९९९)
- झहीर खान – अजित आगरकर : २७ धावा विरुद्ध झिम्बाब्वे – (गोलंदाज हेन्री ओलोंगा, २०००)
दरम्यान, नाणेफेक जिंकून विंडीजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत द्विशतकी भागीदारी केली. रोहित-राहुल मैदानावर असताना विंडीजचे गोलंदाज हतबल दिसत होते. दोन्ही सलामीवीरांनी आपली शतकं झळकावत विंडीजच्या गोलंदाजांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले. अखेरीस अल्झारी जोसेफने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताची जोडी फोडली. यानंतर कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर रोहित शर्माही शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर होपच्या हाती कॅच देऊन माघारी परतला.