पुन्हा एक अंतिम सामना आणि पुन्हा एक पराभव… अशीच काहीशी कथा आहे न्यूझीलंडच्या संघाची. महत्वाच्या सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागणारा संघ म्हणून न्यूझीलंडची ओळख २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्येही कायम राहिली. संपूर्ण स्पर्धेमध्ये दमदार खेळ करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघाला अंतिम सामन्यामध्ये स्थान मिळालं आणि कसोटीचे जेतेपद जिंकणाऱ्या या संघाकडून अपेक्षा वाढल्या. मात्र अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावला. आठ गडी राखून सामना जिंकतानाच ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचं जेतेपदही पटकावलं.

नक्की वाचा >> T20 World Cup: शोएब अख्तर म्हणतो, “वॉर्नरला मालिकावीर पुरस्कार देण्याचा निर्णय अन्यायकारक, हा पुरस्कार तर…”

न्यूझीलंडच्या संघाचा हा २०१५ पासून आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेमधील अंतिम सामन्यातील तिसरा पराभव ठरला. मात्र या पराभवाने निराशा आली असली तरी न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आशा सोडलेली नाही. याचीच झलक न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जिमी नीशामच्या ट्विटवरुन पहायला मिळाली आहे. या टी-२० विश्वचषकामध्ये पराभूत झालो असलो तरी आमचं लक्ष्य आता २०२२ चा विश्वचषक आहे, असं सूचित करणारं ट्विट जिमी नीशामने केलंय. पुढील टी-२० विश्वचषक स्पर्धा ही ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. याच स्पर्धेकडे आता आमचं लक्ष्य आहे असं सूचित करणारं ट्विट जिमी नीशामने यंदाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर केलं आहे.

नक्की वाचा >> …अन् सारा संघ विजयाचा जल्लोष करताना सामना जिंकवून देणारे मात्र खुर्च्यांवरुन हललेही नाहीत; फोटो होतोय व्हायरल

जिमी नीशामने केवळ तीन आकडे आणि पुढे ‘दिवस’ असं ट्विट केलं आहे. “३३५ दिवस”, असं जिमी नीशामच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अनेकांना या ट्विटचा संदर्भ लागला नाही. मात्र बऱ्याच जणांनी जिमी नीशाम हा पुढील टी-२० विश्वचषकासाठी यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर किती दिवस शिल्लक आहे हे दर्शवण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आणून दिलंय. पुढील वर्षी म्हणजे २०२२ साली १६ ऑक्टोबर रोजी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. रविवारी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यानंतर बरोबर ३३५ दिवसांनंतर १६ ऑक्टोबर २०२२ ही तारीख येते. त्यामुळेच जिमी नीशामला पुढील विश्वचषकाची प्रतिक्षा आम्हाला आहे असेच सूचित करायचं आहे. हे ट्विट सध्या चर्चेत असून दोन हजारांहून अधिक वेळा ते रिट्विट करण्यात आलंय.

इंग्लंडविरोधातील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये जिमी नीशामने दमदार खेळी करत यंदाच्या टी-२० विश्वचषकाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या संघाचा धुव्वा उडवला होता. डॅरेल मिचेल (४७ चेंडूंत नाबाद ७२) आणि जिमी नीशाम (११ चेंडूंत २७) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर न्यूझीलंडने इंग्लंडचा पाच गडी व एक षटक राखून पराभव करत टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम सामना जिंकण्यात त्यांना अपयश आलं.

Story img Loader