३३वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आज (रविवार) उत्साहत पार पडली. यामध्ये नेहमीप्रमाणेच अफ्रिकन खेळाडूंचे वर्चस्व राहिले. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकली. यामध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यामध्ये १०२ परदेशी स्पर्धकांचा समावेश आहे.
सारसबागेजवळील बाबुराव सणस मैदानापासून सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेथॉनला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पाहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाल उपस्थित होते.
विविध अंतरासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये फुल मॅरेथॉन (मुख्य) ४२ किमी, हाफ मॅरेथॉन २१ किमी, १० किमी, ५ किमी, व्हीलचेअर या अशा विविध अंतरगटांचा समावेश आहे.