काही दिवसांपूर्वीच दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतलेल्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावलं. ४३व्या वर्षी ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा बोपण्णा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला आहे. मॅथ्यू एब्डेनच्या साथीने रोहनने जेतेपदावर नाव कोरलं. द्वितीय मानांकित रोहन-मॅथ्यू जोडीने बिगरमानांकित सिमोन बोलेली आणि आंद्रेआ वावासोरीवर ७-६ (७-०), ७-५ असा विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या जोडीचं हे पहिलंच जेतेपद आहे. पुरुष दुहेरी प्रकारात रोहनचं हे पहिलंच जेतेपद आहे.

४३व्या वर्षी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा टेनिसपटू ठरला. याआधी हा विक्रम अमेरिकेच्या राजीव रामच्या नावावर होता. राजीवने ऑक्टोबर २०२२ रोजी ३८व्या वर्षी दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं. दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा रोहन हा केवळ चौथा भारतीय टेनिसपटू ठरणार आहे. याआधी लिअँडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनीच ही किमया केली आहे.

कारकीर्दीत रोहनच्या नावावर मिश्र दुहेरीचं एक जेतेपद आहे. २०१७ मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत रोहनने कॅनडाच्या गॅब्रिएला डाब्रोव्हस्कीच्या बरोबरीने खेळताना जेतेपदावर नाव कोरलं होतं. पुरुष दुहेरीत, २०१० मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेत त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. गेल्या वर्षी याच स्पर्धेत इब्डेनबरोबर खेळताना जेतेपदाने निसटती हुलकावणी दिली होती.

४३व्या वर्षी रोहनने मास्टर्स १००० स्पर्धेचं जेतेपद पटकावण्याचा विक्रम केला होता. त्याने इब्डेनच्या बरोबरीने खेळताना जेतेपदाची कमाई केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 year old rohan bopanna wins australian open title in mens double with matthew ebden psp
Show comments