कबड्डी खेळाला न भूतो न भविष्यती परिमाण देणाऱ्या प्रो-कबड्डी स्पर्धेने दूरचित्रवाणी प्रेक्षकांवरही विक्रमी गारूड घातल्याचे समोर आले आहे. पाच आठवडय़ात देशातल्या आठ विविध शहरांत रंगलेल्या सामन्यांचा तब्बल ४३५ दशलक्ष दूरचित्रवाणी प्रेक्षकांनी आस्वाद घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या फुटबॉल विश्वचषकाला देशभरात लाभलेल्या प्रेक्षकसंख्येपेक्षा हे प्रमाण तिप्पट आहे.
इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेनंतर सर्वाधिक प्रेक्षक संख्येच्या (टीआरपी) कार्यक्रमांच्या यादीत प्रो-कबड्डीने दुसरे स्थान पटकावले आहे.
अभिषेक बच्चन यांची मालकी असलेल्या जयपूर पिंक पँथर्स आणि रॉनी स्क्रुवाला यांच्या यू मुंबा यांच्यात रंगलेल्या अंतिम लढतीला ८६.४ दशलक्ष प्रेक्षकांनी पाहिल्याचे स्पष्ट झाले आहे. आयपीएल लढतीला मिळणाऱ्या सरासरी टीआरपी एवढा हा आकडा आहे. या विक्रमी प्रेक्षकसंख्येसह प्रो-कबड्डी स्पर्धेने वर्षभरात झालेल्या फुटबॉल विश्वचषक अंतिम लढत, विम्बल्डन स्पर्धेची अंतिम लढत, हॉकी विश्वचषक अंतिम स्पर्धा या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमांना मागे टाकत भरारी घेतली आहे.
३१ ऑगस्टला मुंबईतील एनएससीआय येथे रंगलेल्या अंतिम मुकाबल्याला भारतातल्या चारपैकी एका घरातील दूरचित्रवाणी संचावर पाहिला गेला. विशेष म्हणजे पहिल्यावहिल्या प्रो-कबड्डी स्पर्धेचा प्रेक्षकवर्ग पुरुषांपुरता मर्यादित नाही. स्पर्धेला मिळालेल्या प्रेक्षकसंख्येपैकी ३९ % महिला तर २२ % मुले आहेत.
उद्योजक आनंद महिंद्रा आणि मशाल स्पोर्ट्स प्रमुख कार्यकारी अधिकारी चारू शर्मा यांच्या संकल्पनेतून रुजलेल्या प्रो-कबड्डी स्पर्धेने देशभरात खेळाच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळाली आहे.
प्रो कबड्डीने घडवली दूरचित्रवाणीवर क्रांती ४३५ दशलक्ष प्रेक्षकांनी अनुभवली स्पर्धा
कबड्डी खेळाला न भूतो न भविष्यती परिमाण देणाऱ्या प्रो-कबड्डी स्पर्धेने दूरचित्रवाणी प्रेक्षकांवरही विक्रमी गारूड घातल्याचे समोर आले आहे.
First published on: 16-09-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 435 million audiences watched pro kabaddi league on television