यावर्षी २६ मार्च ते २९ जून या कालावधीमध्ये इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम पार पडला. कोविड-१९ आजारामुळे यावर्षी महाराष्ट्रातील चार ठिकाणी आयपीएलचे साखळी सामने आयोजित करण्यात आले होता. त्यामध्ये मुंबईतील ब्रेबॉर्न आणि वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचा समावेश होता. या चार ठिकाणी एकूण ७० सामने खेळवण्यात आले होते. या ठिकाणच्या सर्व सामन्यांचे प्रत्यक्ष नियोजन करण्यात तेथील ग्राऊंड स्टाफने बीसीसीआयला मोलाची साथ दिली. म्हणून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यापाठोपाठ आता मुंबई क्रिकेट असोसिएशनदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याच्या तयारीत आहे.
आयपीएल दरम्यान केलेल्या कामगिरीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे (एमसीए) ४८ ग्राउंड्समनला प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. एमसीएच्या सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. ‘आयपीएलच्या काळात एमसीएच्या ग्राउंड्समननी सराव आणि प्रत्यक्ष सामन्यांच्या खेळपट्ट्या तयार करण्यासाठी दिवस-रात्र काम केले. एप्रिल-मेच्या कडाक्याच्या उन्हात दररोज सामने खेळले जात असतानाही खेळपट्ट्यांबद्दल एकही तक्रार आली नव्हती. हे सर्व कर्मचाऱ्यांच्या काबाड कष्टामुळे शक्य झाले. त्यांच्या प्रामाणिक कष्टांचे कौतुक म्हणून ४८ ग्राउंड्समनला प्रत्येक एक लाख रुपये बक्षिस देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे,’ असे एमसीएमे सांगितले आहे.
हेही वाचा – IND vs ENG: रोहित आणि विराटच्या चुकीमुळे भारतीय संघाला मिळाली वॉर्निंग! का ते वाचा
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममधील ५७ वर्षीय ग्राउंड्समन वसंत मोहिते यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, ‘या पूर्वीच्या आयपीएल हंगामांमध्ये ते स्टेडियममध्येच एका छोट्याशा खोलीत रात्र काढत असत. कारण, रात्री उशिरा सामना संपूपर्यंत रेल्वे सेवा बंद होत असे. १५व्या हंगामादरम्यान मात्र, असे झाले नाही. एमसीएने कॅडबरी या खासगी कंपनीशी करार केला होता. ज्यामुळे वानखेडे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफला पंचतारांकित हॉटेलमध्ये राहता आले. सामन्याच्या दिवसात राहण्याची आणि प्रवासाची सर्व काळजी कंपनीने घेतली.’