राज्य सरकारच्या ५० लाखांच्या अनुदानाच्या जोरावर कबड्डी, खो-खो, कुस्तीपाठोपाठ आता व्हॉलीबॉल या खेळाच्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा घाट घातला गेलाय. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न देता.. आर्थिक वर्ष (३१ मार्च) संपण्याच्या आत ही स्पर्धा उरकण्यात आलीय, असेच चित्र दिसत आहे. सचिन अहिर यांच्या पुढाकाराने मुंबई जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेला या स्पर्धेच्या संयोजनाचा मान मिळाला. वरिष्ठ स्तरावर ही स्पर्धा न घेता २१ आणि १८ वर्षांखालील मुला-मुलींमध्ये ही स्पर्धा घेतली गेली. अधिक युवा खेळाडू तयार व्हावेत आणि त्यांना घसघशीत इनाम मिळावे, हा यामागचा उद्देश. मात्र या निर्णयावरही अनेकांचा आक्षेप आहेच. एक वर्ष २१ वर्षांखालील संघात खेळल्यानंतर त्या खेळाडूचे पुढचे भवितव्य काय, हा प्रश्न समोर उभा राहतोच. याचे उत्तर ना संघटकांकडे आहे, ना महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेकडे.
सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. तरीही अमरावती, नागपूर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, पुणे, लातूर आणि औरंगाबाद या आठ विभागातील प्रत्येकी ३२ संघ १८ आणि २१ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात सहभागी झाले. फक्त परीक्षेच्या कारणामुळे १८ वर्षांखालील गटात नाशिकचा मुलींचा संघ सहभागी होऊ शकला नाही. खरे तर जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला ही स्पर्धा होणे अपेक्षित होते. तरीही घाईघाईने ऐन परीक्षेच्या काळातच ही स्पर्धा घेण्यात आली. त्यामुळे कोणत्याही संघाला अपेक्षेइतकी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे एकूणच स्पर्धेचा दर्जा खालावला गेला.
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आणि राज्य सरकारच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या विद्यमाने आयोजित होणाऱ्या या स्पर्धेकडे राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली. फक्त संघटनेचे सचिव वगळता एकही पदाधिकारी या स्पर्धेला फिरकला नाही. मुंबई शहर जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे मोजके पदाधिकारी वगळले तर कबड्डीतील काही कार्यकर्ते या स्पर्धेच्या संयोजनात पुढे येताना दिसताहेत.
या स्पर्धेसाठी इलेक्ट्रॉनिक गुणफलकाची सोय उपलब्ध असली तरी कोणत्या खेळाडूने किती गुण मिळवले, याची कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे स्पर्धेमधील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार कसा काय दिला जातो, हे मात्र कोडेच आहे. ५० लाखांमधून खेळाडूंना १७.५ लाख रुपये बक्षिस स्वरूपात दिले जाणार आहेत. या बक्षिसाच्या रकमेमुळे काही खेळाडूंच्या शिक्षणात हातभार लागणार आहे, हे नक्की. पण या स्पर्धेद्वारे खरोखरच चांगले खेळाडू तयार होणार आहेत का, हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात व्हॉलीबॉल हा प्रचंड लोकप्रिय खेळ आहे, असे म्हटले जाते. पण महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धामध्ये बाद फेरीचा अडथळा अद्याप पार करता आलेला नाही. म्हणूनच ५० लाखांचे चीज होणार का, याचा विचार राज्य सरकार आणि व्हॉलीबॉल संघटकांना करावा लागणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा