फुटबॉलसम्राट पेलेच्या भूमीत ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक स्पध्रेत १० क्रमांकाच्या जर्सीची जादू पाहायला मिळाली. लिओनेल मेस्सी, जेम्स रॉड्रिगेझ, नेयमार, करीम बेंझेमा अशा अनेक १० क्रमांकाची जर्सी धारण केलेल्या खेळाडूंनी पराक्रम गाजवला. पेले आणि दिएगो मॅरेडॉनामुळे जसे १० क्रमांकाच्या जर्सीला वैभव प्राप्त झाले, तसेच क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने या जर्सीला महत्त्व मिळवून दिले. पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि फुटबॉलचा निस्सीम चाहता असलेला भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना मात्र ७ क्रमांकच अधिक भावतो. सध्या भारतात सुरू असलेल्या प्रो-कबड्डी लीगमध्येही चर्चेतल्या कबड्डीपटूंनी सचिन, धोनी, रोनाल्डो यांच्या जर्सी क्रमांकांना पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे आणि हे खेळाडूच प्रामुख्याने चमकत असल्याचा प्रत्ययसुद्धा येत आहे.
बंगाल वॉरियर्सकडून खेळणाऱ्या महाराष्ट्रातील सांगलीच्या नितीन मदनेला लहानपणापासूनच धोनी अत्यंत आवडतो. त्यामुळेच तो ७ क्रमांकासह दिसत आहे. राज्य आणि राष्ट्रीय अजिंक्यपद स्पध्रेतही मदने ७ क्रमांकाची जर्सी परिधान करतो. जून २०११मध्ये झालेल्या कबड्डी प्रीमियर लीग (केपीएल) स्पध्रेतसुद्धा मदनेने हाच क्रमांक जोपासला होता. त्यावेळी केपीएलमधील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूचे पारितोषिकही त्याने पटकावले होते. साखळीतील १२ सामन्यांमध्ये मदनेच्या खात्यावर चढायांचे १०१ गुण जमा आहेत. ‘‘धोनीवर माझे निस्सीम प्रेम आहे. त्यामुळे जर्सीचा क्रमांकच नव्हे तर माझ्या गाडीचा क्रमांकही ००७ आहे,’’ असे नितीनने सांगितले.
‘यु मुंबा’ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुंबई उपनगरच्या रिशांक देवाडिगानेही ७ क्रमांकावरच मोहोर उमटवली आहे. अष्टपैलू खेळाची चुणूक दाखवणाऱ्या रिशांकच्या खात्यावर १४ सामन्यांत चढायांचे ५९ आणि पकडीचे १४ गुण जमा आहेत. याबाबत रिशांक म्हणतो, ‘‘७ हा क्रमांक माझ्यासाठी नेहमी यशदायी ठरतो. याचप्रमाणे ख्रिस्तियानो रोनाल्डो हा माझा आवडता खेळाडू असल्यामुळे मी ७ क्रमांक मिळण्यासाठी आग्रही असतो.’’ याचप्रमाणे ‘दबंग दिल्ली’च्या जसमेर सिंगने ७ क्रमांकाच्या जर्सीला न्याय देताना १४ सामन्यांत चढायांचे ७ आणि पकडींचे ३९ गुण वसूल केले आहेत. त्यांचाच सुरजीत नरवाल हा सचिनच्या प्रेमाखातर १० क्रमांकाच्या जर्सीसह खेळत आहे. त्याने १४ सामन्यांत चढायांचे एकंदर ११३ आणि पकडींचे ६ गुण जमा केले आहेत.
‘बंगळुरू बुल्स’चा कर्णधार अजय ठाकूरने संघाच्या यशात सिंहाचा वाटा उचलल्याचे आढळते. ७ क्रमांकाच्या जर्सीनिशी मैदानात उतरणाऱ्या अजयने १३ सामन्यांत चढायांचे १११ आणि पकडींचे ६ गुण मिळवले आहेत. या संघाने १० क्रमांक कोणत्याही खेळाडूला दिलेला नाही. ‘पुणेरी पलटण’कडून खेळणाऱ्या ७ क्रमांकाच्या कालिमुथ्थू बालमहेंद्रनने १४ सामन्यांत चढायांचे १२ आणि पकडीचे २० गुण कमवत आपला प्रभाव दाखवला आहे, तर १० क्रमांकाचा खेळाडू प्रवीण नेवाळेने ८ सामन्यांत चढायांचे २० गुण मिळवले आहेत.
‘पाटणा पायरेट्स’चा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा अनुभवी कर्णधार राकेश कुमार ७ क्रमांकाची जर्सी परिधान करतो. त्याने १४ सामन्यांत चढायांचे ८९ आणि पकडींचे १० गुण मिळवले आहेत. मुंबईतील पहिल्या टप्प्यात ‘यु मुंबा’विरुद्धच्या लढतीत अखेरच्या चढाईत अनपेक्षित तीन गुण मिळवून ‘तेलुगू टायटन्स’ला बरोबरी साधून देणारा सुकेश हेगडे ७ क्रमांकाच्या जर्सीसह खेळतो. त्याने १४ सामन्यांत चढायांचे ८० आणि पकडींचे ५ गुण मिळवले आहेत.
चढायांमध्ये राहुल चौधरी आणि पकडींमध्ये मनजीत चिल्लर अव्वल
प्रचलित क्रमांकांप्रमाणेच काही वेगळ्या क्रमांकांचीसुद्धा प्रो-कबड्डीवर छाप आढळते. सध्या सर्वाधिक चढायांच्या यादीत आघाडीवर असलेला तेलुगू टायटन्सचा राहुल चौधरी १ क्रमांकाची जर्सी परिधान करतो. त्याच्या खात्यावर चढायांचे १५१ आणि पकडींचे ९ गुण जमा आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेला यु मुंबाचा कर्णधार अनुप कुमार ३ क्रमांकाची जर्सी परिधान करतो. १४ सामन्यांत अनुपच्या खात्यावर चढायांचे सर्वाधिक १३७ गुण जमा आहेत, तसेच पकडींचेही १५ गुण त्याने मिळवले आहेत. पकडींचे सर्वाधिक ४१ गुण (१४ सामन्यांत) बंगळुरू बुल्सच्या मनजीत चिल्लरच्या नावावर आहेत. त्याच्या खात्यावर चढायांचेही ७० गुण आहेत. त्याचा जर्सी क्रमांक ५ आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावरील यु मुंबाच्या सुरेंदर नाडाने पकडींचे ४० गुण मिळवले आहेत. त्याचा जर्सी क्रमांक १ आहे.
एखाद्या जर्सी क्रमांकाने यश मिळणे, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा किंवा विश्वासाचा भाग आहे, असे मला वाटते. काही नावाजलेल्या खेळाडूंच्या बाबतीतसुद्धा आपण श्रद्धा किंवा अंधश्रद्धेची उदाहरणे ऐकतो. मानसिकदृष्टय़ा या सर्व गोष्टींचे परिणाम आपल्याला खेळांमध्ये दिसत असतात. प्रत्येकाला क्रमांक निवडण्याची संधी प्रो-कबड्डीमध्ये होती. काही खेळाडूंनी जगद्विख्यात खेळाडूंच्या क्रमांकांचे अनुकरण केल्याचे जाणवत आहे.
राजू भावसार, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू आणि समालोचक