आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी सात संघटक रिंगणात आहेत. ही निवडणूक २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

प्रिन्स अली बिन अल हुसेन, मुसा बिलिटी, जेरोमी चॅम्पिग्ने, गिआनी इन्फाटिनो, मायकेल प्लाटिनी, शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा, टोकिओ सेक्सावेल यांच्यात ही निवडणूक होणार आहे. त्रिनिदाद व टोबॅकोच्या डेव्हिड नाखिद यांनीही अर्ज सादर केला होता, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.
नाखिद यांना शिफारस केलेल्या पाच राष्ट्रीय संघटनांपैकी एका प्रतिनिधीने यापूर्वीच अन्य उमेदवारासाठी शिफारस केली असल्यामुळे नाखिद यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला पाच सदस्यांची शिफारस आवश्यक आहे व हे सदस्य वेगवेगळे असणे अनिवार्य आहे.
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपामुळे प्लाटिनी यांना तीन महिन्यांकरिता फिफामधून निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार त्यांना अध्यक्षपदासाठी उभे राहता येणार नाही. फिफाच्या निवडणूकसमितीद्वारे त्यांच्या अर्जाची छाननी केली जात असून त्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे.

फिफावरील संकटाला प्लॅटिनी
जबाबदार – ब्लाटर
मॉस्को : भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) मलीन झालेल्या प्रतिमेला मिचेल प्लॅटिनी, इंग्लंड आणि अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप मावळते अध्यक्ष सेप ब्लाटर यांनी केला. ‘‘सुरुवातीला हा वैयक्तिक हल्ला होता. प्लॅटिनी विरुद्ध मी असा, परंतु त्यानंतर त्याला वेगळे स्वरूप प्राप्त झाले. विश्वचषक आयोजनाचा मान मिळवण्यात अपयशी ठरलेल्यांनीही यात उडी मारली. त्यानंतर तो इंग्लंड विरुद्ध रशिया आणि अमेरिकाविरुद्ध कतार असा रंगू लागला,’’ असा आरोप ब्लाटर यांनी केला.
ब्लाटर यांच्यामते प्लॅटिनीच यामागचे सूत्रधार आहेत. ते म्हणाले, ‘‘प्लॅटिनी यांना फिफाचे अध्यक्षपद हवे होते, परंतु त्यासाठी पुढाकार घेण्याचे धाडस त्यांच्यात नव्हते. त्यानंतर त्यांनी फिफामध्ये कलह निर्माण केले. अखेरीस या सर्व प्रकरणात प्लॅटिनीच अडकले.’’

Story img Loader