बहुतेकांना वाहत्या पाण्याची भीती वाटते आणि तेच पाणी जर यमुनेसारख्या मोठ्या नदीतील असेल तर मग विचारूच नका. मात्र, प्रयागराजमधील एक आठ वर्षांचा मुलगा याला अपवाद आहे. शिवांश मोहिले नावाच्या या आठ वर्षांच्या मुलाने यमुनेच्या पाण्यात उतरून विक्रम केला आहे. त्याने अवघ्या १८ मिनिटांत यमुना नदी पार केली आहे. १८ मिनिटांमध्ये यमुना पार करणारा शिवांश पहिलाच मुलगा ठरला आहे. त्यापूर्वी, आराध्य श्रीवास्तव नावाच्या मुलाने २२ मिनिटांमध्ये यमुना पार केली होती.
शिवांश सध्या टागोर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकतो. याशिवाय, नवजीवन जलतरण क्लबमध्ये तो पोहण्याचे प्रशिक्षणही घेतो. त्याने आपल्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मीरापूर सिंधू सागर घाट (काकरा घाट) येथून सकाळी सहा वाजता पाण्यात उडी मारली होती. सहा वाजून १८ मिनिटांनी तो नदीच्या दुसऱ्या टोकाला पोहचला. यादरम्यान, आपत्कालीन मदतीसाठी पाच बोटी तैनात होत्या. शिवांशच्या कामगिरीमुळे त्याचे आई-वडील विकास आणि खुशी मोहिले यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे’, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली.
हेही वाचा – IND vs ENG : ‘हा’ २१ वर्षीय गोलंदाज ठरला भारतीय संघाची डोकेदुखी
मुख्य प्रशिक्षक निषाद त्रिभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवजीवन जलतरण क्लबच्या बॅनरखाली सध्या सर्व वयोगटातील १०० मुले प्रशिक्षण घेत आहेत. शिवांश हा यावर्षीचा दोन ते आठ वयोगटातील पहिला प्रशिक्षणार्थी जलतरणपटू आहे. शिवांश आता वेळ आणखी कमी करण्यावर भर देणार आहे. अवघ्या आठ वर्षांच्या शिवांशचे त्याने केलेल्या कामगिरीमुळे कौतुक होत आहे.