केरळमधील एका माजी आमदाराने वयाच्या ८१ व्या वर्षी भारतासाठी दोन कांस्य पदकं जिंकण्याचा पराक्रम केलाय. वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटीक्स चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (एम)चे माजी आमदार एम. जे. जॅकब यांनी ही कामगिरी करुन दाखवलीय. जॅकब यांचा नुकत्याच झालेल्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये टी. एम. जॅकब यांच्याकडून पराभव झाला. ते यापूर्वी चारवेळा आमदार राहिले आहेत.

नक्की पाहा >> फलंदाजाने मारला भन्नाट षटकार; चेंडू थेट मैदानाबाहेरील रस्त्यावर चालणाऱ्या तरुणाच्या पोटात लागला, Video होतोय Viral

२००६ साली जॅकब यांना एका कार्यक्रमासाठी महाराज कॉलेजमध्ये आमंत्रित करण्यात आलेलं. त्यावेळी कॉलेजच्या काळात अ‍ॅथलेटीक्समध्ये सक्रीय असणाऱ्या जॅकब यांना धाव्याचा मोह आवरला नाही. स्पर्धेला झेंडा दाखवल्यानंतर ते स्वत: काही अंतर धावले मात्र १०० मीटर अंतरानंतर त्यांना थकवा जाणवू लागला. या प्रसंगानंतर जॅकब यांनी पुन्हा एकदा अ‍ॅथलेटीक्सकडे वळण्याचा निर्णय घेतलाय. या घटनेनंतर तब्बल १६ वर्षांनी त्यांना वयाच्या ८१ व्या वर्षी थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्यामध्ये यश आलंय.

पाहा व्हिडीओ –

अनेक राष्ट्रीय आणि आशियाई मास्टर्स स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या जेकॉब यांनी आता २०० मीटर आणि ८० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये कांस्य पदकांची कमाई केलीय. फिनलॅण्डमधील टॅम्पेरे येथे १० जुलै रोजी पार पडलेल्या स्पर्धेमध्ये त्यांनी ही कामगिरी केलीय. ३५ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकते. जेकॉब यांनी ८० वर्षांवरील वयोगटामध्ये पदकांची कमाई केलीय.

“जागतिक स्तरावर वैयक्तिक स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच पदकाची कमाई केली आहे. हे मोठं यश आहे की नाही मला ठाऊक नाही. मात्र ही नक्कीच समाधान देणारी कामगिरी आहे,” असं जेकॉब यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलंय.

ही जेकॉब यांची जागतिक स्तरावरील चौथी स्पर्धा होती. यापूर्वी त्यांनी २०१५ मध्ये फ्रान्स, २०१६ मध्ये ऑस्ट्रेलिया, २०१८ मध्ये स्पेनमधील स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तसेच त्यांनी आशियाई मास्टर्सच्या २०१४ मधील जपानच्या स्पर्धा, सिंगापूरमध्ये २०१६ साली झालेली स्पर्धा त्याचप्रमाणेच चीनमधील २०१७ ची आणि मलेशियातील २०१२ च्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता.