फिफा विश्वचषकाची स्पर्धा यंदा ८४ वर्षांची झाली. ज्युलिअस रिमे या एका व्यवसायाने वकील असलेल्या फ्रेंच व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे ही स्पर्धा सुरू झाली. १९०४ मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘फिफा’ची (आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ) स्थापना झाली. जगातील अव्वल दर्जाचे फुटबॉल खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये दर चार वर्षांनी विश्वविजेतेपदाची स्पर्धा व्हावी, हे रिमे यांचेच स्वप्न. १९२० मध्ये ते फिफाचे अध्यक्ष झाले. मग विश्वचषक स्पध्रेला मूर्तस्वरूप प्राप्त करून देण्यासाठी रिमे यांनी हिरिरीने प्रयत्न केले. १९२९ च्या फिफाच्या बैठकीत रिमे यांच्या प्रस्तावाला सर्वानी एकमुखी पाठिंबा दिला आणि पहिलीवहिली विश्वचषक स्पर्धा उरुग्वेत झाली.
१३ राष्ट्रांनी भाग घेतलेल्या या स्पध्रेत यजमान उरुग्वेने अंतिम फेरीत अर्जेटिनाचा ४-२ असा पराभव करून विश्वविजेतेपदावर नाव कोरले. १९३० ते ७० या कालखंडात विजेत्या संघाला ‘ज्युलिअस रिमे चषक’ दिला जायचा, ज्याला ‘व्हिक्टरी’ असेही संबोधले जायचे. त्यानंतर १९७४ ते आजमितीपर्यंत विजेत्याला ‘फिफा विश्वचषक’ दिला जातो. या विश्वचषकाच्या पायथ्याशी वर्ष आणि विश्वविजेत्या संघाचे नाव (उदा. २०१० स्पेन) कोरण्यात येते. आतापर्यंत दहा विश्वविजेत्या संघांची नावे यावर नमूद करण्यात आली आहेत. आणखी चार विश्वविजेत्या संघांची नावे यावर कोरता येऊ शकतील, इतकीच जागा आता उपलब्ध आहे. याचाच अर्थ २०३० मध्ये फिफा विश्वचषक आपले गौरवशाली शतक साजरे करील, त्या वेळी नव्या विश्वचषकाची निर्मिती होईल.
१. ज्युलिअस रिमे चषक (१९३० ते १९७०)
फिफाने फ्रेंच शिल्पकार अॅबेल लॅफलूर यांच्याकडून पहिल्या जागतिक स्पध्रेसाठी विश्वचषकाचे शिल्प तयार करून घेतले. शिल्पकाराने पंख पसरलेल्या प्राचीन ग्रीक विजयाच्या देवीचे शिल्प घडवले होते. या चषकासाठी ६.८ किग्रॅ. चोख सोने वापरले होते. त्याची उंची ३५ सेंटीमीटर (१४ इंच) होती. अॅबेल यांच्या कलाकृतीला तोड नव्हती. पहिल्या स्पध्रेसाठी जहाजाने विश्वचषक नेण्यात आला आणि प्रथम विजेत्या उरुग्वेलाच प्रदान करण्यात आला.
१९३८ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इटलीने विश्वविजेतेपद पटकावले होते. जर्मन सैन्याने युद्धाच्या अंतिम टप्प्यात इटलीच्या काही भागावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. तेव्हा फुटबॉल विश्वाची ही बहुमोल मालमत्ता नाझींपासून वाचवण्यासाठी फिफाचे उपाध्यक्ष ओट्टोरिनो बारासी यांनी हा चषक एका बुटाच्या खोक्यात ठेवून तो बिछान्याखाली लपवून ठेवला होता.
विश्वचषकाच्या ‘चौर्य’कथा!
१९६६ मध्ये इंग्लंडने ज्युलिअस रिमे विश्वचषक स्पध्रेचे यजमानपद सांभाळले, तोवर या चषकासंबंधी कोणतीही नाटय़मय घटना घडली नव्हती. ही स्पर्धा सुरू होण्याच्या काही आठवडय़ांपूर्वी हा विश्वचषक लंडनमधील वेस्टमिनस्टर सेंट्रल सभागृहात ठेवण्यात आला होता. यादरम्यानच चषकाची चोरी झाली आणि सदर घटनेने इंग्लंडमधील संपूर्ण सुरक्षाव्यवस्थेला जबरदस्त हादरा बसला. चोरीच्या घटनेनंतर आठवडय़ाभरातच दक्षिण लंडन परिसरात डेव्हिड काव्र्हेट आपल्या पाळीव श्वानासोबत बगिच्यात फिरायला गेला होता, तेव्हा झाडांमध्ये पेपरमध्ये गुंडाळलेली एक वस्तू कुत्र्याने लक्षात आणून दिली. काव्र्हेटने जेव्हा ती वस्तू उचलली तेव्हा पेपरमध्ये कसून गुंडाळलेली ती एखादी मूर्ती असावी, असा त्याचा अंदाज होता. परंतु त्याने शीघ्रतेने सर्व कागद बाजूला केल्यावर त्याला धक्का बसला. जर्मनी, उरुग्वे, ब्राझील अशी नावे त्यावर कोरलेली होती. काव्र्हेट फुटबॉलप्रेमीच असल्यामुळे हे शिल्प म्हणजे चोरीला गेलेला विश्वचषकच असल्याचे त्याच्या लक्षात आले. या घटनेने २६ वर्षीय काव्र्हेट आणि त्याचा दोन वर्षांचा श्वान पिकल्स यांना रातोरात नायक बनवले. १९७३ मध्ये पिकल्सचे निधन झाले, परंतु आजही त्याचे नाव फुटबॉल रसिकांच्या स्मरणात आहे. १९७० मध्ये ब्राझीलने तिसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धा जिंकून ज्युलिअस रिमे चषक आपल्याकडेच ठेवण्याचा अधिकार प्राप्त केला.
रिओ दी जानेरिओ येथील ब्राझील फुटबॉल महासंघाच्या मुख्यालयात बुलेट-प्रूफ काचेच्या कपाटात हा विश्वचषक प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. पण २० डिसेंबर १९८३ या दिवशी चोर विश्वचषक घेऊन पसार झाले. या गुन्ह्य़ाप्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले; परंतु या चोरांनी सोन्याचा विश्वचषक वितळवून त्याचे पैसे मिळवल्याचे सिद्ध झाले. नंतर ब्राझील फुटबॉल महासंघाने इस्टमन कोडॅक कंपनीकडून १.८ किग्रॅ. वजनाची विश्वचषकाची प्रतिकृती तयार करून घेतली आणि १९८४ मध्ये ब्राझीलच्या तत्कालीन राष्ट्राध्यक्षांना ती प्रदान करण्यात आली.
२. फिफा विश्वचषक
(१९७४ पासून आतापर्यंत)
ब्राझीलने विश्वचषकावर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर १९७४ मध्ये विश्वविजेत्या संघाला देण्यासाठी एका नव्या चषकाची निर्मिती करण्यात आली. हा नवा विश्वचषक १९७४ च्या जगज्जेत्या जर्मनी संघाने सर्वप्रथम जिंकण्याची किमया साधली. या चषकाची निर्मिती इटलीचा सिद्धहस्त शिल्पकार सिल्व्हिओ गाझानिगा यांनी केली. सात देशांच्या ५३ शिल्पकारांकडून विश्वचषकाची रेखाकृती मागवण्यात आली होती, पण सिल्व्हिओचे चित्र सर्वाना भावले. या विश्वचषकासाठी ४.९७ किग्रॅ. १८ कॅरेट चोख सोने वापरण्यात आले होते. हा चषक ३६.५ सेंटीमीटर (१४.४ इंच) उंचीचा असून, तो तयार करण्यासाठी दोन लाख ३० हजार अमेरिकन डॉलर्स खर्च आला होता. या कलाकृतीमध्ये दोन खेळाडू हात उंचावून एकमेकांना पाठ करून उभे आहेत आणि त्यांच्या खांद्यावर पृथ्वी (म्हणजेच फुटबॉल) आहे, जी दोघांच्या हातांनी पेलली आहे.