या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या (आयपीएल) आगामी १४व्या हंगामादरम्यान खेळाडूंना वेळेचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार ‘आयपीएल’मधील प्रत्येक सामन्याच्या एका डावातील २० षटके ९० मिनिटांत (दीड तास) पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा खेळाडूंसह कर्णधारावर कारवाई केली जाऊ शकते.

चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु यांच्यातील लढतीने ९ एप्रिलपासून ‘आयपीएल’ला प्रारंभ होणार आहे. साधारणपणे ९०व्या मिनिटाला अथवा त्यानंतर २०व्या षटकाला सुरुवात होते. परंतु बहुतांश वेळा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार तसेच फलंदाज सामन्याच्या परिस्थितीनुसार अतिरिक्त वेळ खर्ची घालून सामना लांबवतात. त्यामुळे प्रेक्षकांचाही खोळंबा होतो. म्हणूनच या ‘आयपीएल’मध्ये संघांना ९० मिनिटांत २० षटकांच्या गोलंदाजीची जबाबादारी पेलावी लागणार आहे. यामध्येच अडीच मिनिटांच्या दोन रणनीतीच्या विश्रांतीचाही समावेश करण्यात आला आहे.

‘‘प्रत्येक तासाला १४.१ षटके पूर्ण करण्याचे बंधन संघांना असेल. त्यानुसार ९० मिनिटांच्या कालावधीत (दोन रणनीतीच्या विश्रांतीसह) २० षटके नक्कीच पूर्ण होतील. तसे न झाल्यास खेळाडूंच्या सामन्याच्या मानधनातून रक्कम कापण्यासह कर्णधारावरही कारवाई करण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

पंचांच्या अंदाजित आढाव्यालाही बंदी

भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान चर्चेचा मुद्दा ठरलेल्या मैदानावरील पंचांच्या अंदाजित आढाव्यालाही (सॉफ्ट सिग्नल) ‘आयपीएल’दरम्यान बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही निर्णयाविषयी साशंका असल्यास मैदानावरील पंचांनी अंदाजित निर्णय न घेता थेट तिसऱ्या पंचांकडे जबाबदारी सोपवावी. तिसऱ्या पंचांना योग्य पुराव्यानुसार अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 90 minutes restriction for 20 overs innings abn
Show comments