‘‘स्वप्न नसतील तर आयुष्याला अर्थच उरणार नाही. स्वप्न पाहणे आणि ती पूर्ण करणे, हे माझ्या मते जीवनात फार महत्त्वाची भूमिका बजावतात. स्वप्न पाहा, कारण ती प्रत्यक्षात अवतरतात!’’
– सचिन तेंडुलकर
सचिनचे क्रिकेटमधील यश आणि देशासाठीचे योगदान यांचा यथोचित सन्मान करण्याच्या इराद्याने भारतीय वायुदलाने त्याला ‘ग्रुप कॅप्टन’ ही उपाधी दिली होती. त्याच्या त्या वेळच्या या भाषणाने साऱ्यांनाच प्रेरित केले होते. क्रिकेट जगतात विश्वविक्रमांचा महामेरू ठरणाऱ्या सचिनची एकदिवसीय कारकीर्द सुरू झाली होती ती मात्र शून्याने. पहिल्या दोन्ही सामन्यांत भोपळाही फोडू न शकणाऱ्या सचिनने पुढे एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा एव्हरेस्ट उभा केला.
एका करिष्म्याची सुरुवात..
१९८९मध्ये पाकिस्तानविरुद्ध सचिनने एकदिवसीय पदार्पण केले, ते शून्याने. नंतर १९९०मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी सचिन पाकिस्तान दौऱ्यावर गेला, तेव्हा सर्वानाच त्याचे कौतुक वाटत होते. या दौऱ्यात पेशावरमध्ये एका प्रदर्शनीय सामन्यात सचिनने १८ चेंडूंत ५३ धावांची वादळी खेळी साकारत सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. महान फिरकी गोलंदाज अब्दुल कादीरच्या एका षटकात त्याने अनुक्रमे ६ ४ ० ६ ६ ६ अशी २८ धावांची आतषबाजी केली होती. मिसरूडही न फुटलेल्या या छोटय़ा जवानाची कर्तबगारी पाहून कादीर अक्षरश: अवाक झाला होता. सचिन नावाच्या महिम्याला प्रारंभ झाला होता.
जादूई षटकाची कमाल
१९९३मध्ये ईडन गार्डन्सचा तो सामना गोलंदाज सचिनने जिंकून दिला होता. अजित वाडेकर त्या वेळी भारताचे प्रशिक्षक होते. दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात विजयासाठी ६ धावांची आवश्यकता होती. कपिल अखेरचे षटक टाकणार, असेच सर्वाना वाटत होते. अझर, कपिल आणि सचिनने मैदानावर बराच वेळ सल्लामसलत केली. मग कपिलने चेंडू सचिनकडे दिला, तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटले. पण सचिनने आपल्या जादूई षटकाने आफ्रिकेची तारांबळ उडवली. त्यामुळे भारताने तो सामना आणि त्यानंतर हीरो होंडा चषक स्पर्धाही जिंकण्याची करामत केली.
वादळी खेळी
१९९८मध्ये सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध साकारलेल्या १४३ धावांच्या खेळीचे ‘वादळी खेळी’ असेच वर्णन समालोचक रवी शास्त्री यांनी केले होते. शारजात कोकाकोला चषक क्रिकेट स्पध्रेची अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ४६ षटकांत २३७ धावांचे आव्हान पेलायचे होते. पण सचिनने प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना विश्वासाने सांगितले होते की, ‘‘काळजी करू नका, मी अखेपर्यंत मैदानावर थांबेन!’’ मायकेल कॉस्प्रोविझला षटकार ठोकून सचिनने आपल्या खेळीला प्रारंभ केला. त्यानंतर दुबईत वाळूचे वादळ घोंघावले. क्षणभर सारेच धास्तावले होते. पण काही मिनिटांनंतर ते शमले आणि सचिन पुन्हा मैदानावर आला. मग शारजात आणखी एका वादळाने महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नसहित साऱ्या ऑसी गोलंदाजांचा पालापाचोळा केला. दुर्दैवाने ती लढत भारत जिंकू शकला नाही. पण भारताला अंतिम फेरीत स्थान मात्र सचिनने मिळवून दिले.
छोटा ‘डॉन’!
२४ एप्रिल १९९८ या सचिनच्या वाढदिवसादिवशी ऑस्ट्रेलियाशीच अंतिम मुकाबला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल २७३ धावांचे आव्हान उभे केले, तेव्हा भारत काही हा सामना जिंकणार नाही, असेच वाटत होते. पण मैदानावर सचिन नामक वादळ पुन्हा घोंघावले. १३४ धावांची आणखी एक तडाखेबाज खेळी साकारत सचिनने भारताला जेतेपद जिंकून दिले. आपल्या २५व्या वाढदिवसाची भेट म्हणून सचिनने हे शतक पत्नी अंजलीला समर्पित केले. या खेळीत सचिनने क्रॉस्प्रोविझला मारलेला षटकार स्टेडियमच्या छतावर गेला. तेव्हा समालोचक टोनी ग्रेग अवाक झाले. ‘‘ही वामनमूर्ती व्यक्ती आपल्या खेळीतून साक्षात डॉन ब्रॅडमनची आठवण देते,’’ असे ते म्हणाले होते. या सामन्यानंतर सचिनच्या खेळावर भाळलेल्या वॉर्नने आपल्या टी-शर्ट्सवर या महान भारतीय फलंदाजीची स्वाक्षरी घेतली होती.
देवदुर्लभ यश
२३ मे १९९९ हाच तो दिवस होता आणि स्थळ होते इंग्लंडमधील ब्रिस्टॉल. ‘‘बाबा, हे शतक तुम्हाला समर्पित..!’’ आभाळाकडे पाहून सचिन तेंडुलकरने बॅट उंचावली, तेव्हा ३३ कोटी देवांनीही त्याच्यावर फुले वर्षांवण्यासाठी नभांगणात गर्दी केली असावी. वडील ख्यातनाम साहित्यिक रमेश तेंडुलकर यांच्या निधनामुळे सचिनला इंग्लंडच्या विश्वचषक दौऱ्याहून माघारी परतावे लागले होते. परंतु तिकडे साता समुद्रापार भारतीय क्रिकेट संघाची अवस्था कठीण झाली होती. आधी दक्षिण आफ्रिका, मग झिम्बाब्वेसारख्या संघानेही भारताला हरवले. सलग दोन पराभवांनंतर भारताचे आव्हान टिकणेही मुश्कील झाले होते. परंतु सचिनची आई रजनी तेंडुलकरने त्याला धीर दिला. ‘‘तू इंग्लंडमध्ये जा आणि देशासाठी खेळ. तिथे तुझी गरज आहे. तुझे वडील असते तर तेही तुला हेच म्हणाले असते.’’ सचिनसाठी हा आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंग होता. परंतु वडिलांच्या निधनाने सचिनला मनाने खंबीर बनवले. गडाचे सारे दोर तोडण्यात आले आहेत. आता जिंकू किंवा मरू, या आविर्भावाने लढा. हा तानाजी मालुसरेचा इतिहास सचिनला पक्का पाठ होता. केनियाविरुद्धच्या लढतीत सचिनने १०१ चेंडूंत १४० धावांची शतकी खेळी साकारली आणि भारताला जिंकून दिले. तेव्हा त्याच्या मानसिक कणखरतेचा साऱ्या भारतभूमीला अभिमान वाटला होता.
मानसिक महारथी
२०११च्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानविरुद्धच्या उपान्त्य फेरीतील विजयात सचिनचे योगदान मोठे आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचे मानसोपचारतज्ज्ञ पॅडी अपटन यांनी सराव संपल्यावर सर्व भारतीय क्रिकेट संघाला एकत्रित बोलावले. सर्वाना वाटले की आता हे महाशय आपल्याला व्याख्यान देतील. परंतु आता तुमच्यासमोर सचिन बोलणार आहे, असे सांगून ते चक्क खुर्चीवर जाऊन बसले. मग सचिनच्या शब्दांनी भारतीय क्रिकेट संघाचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि भारताने पाकिस्तानला नमवण्याची किमया साधली. हा सचिन फक्त व्याख्यान देऊन थांबला नाही, तर या सामन्यात मैदानावरही तो महावीराप्रमाणे लढला आणि सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
अश्वमेध संपलेला नाही!
२००५-०६मध्ये नेमका इंग्लंडचा संघच भारत दौऱ्यावर आला होता. वानखेडे स्टेडियमवर आपल्या घरच्या क्रिकेटरसिकांच्या साक्षीने सचिनची बॅट तळपेल, अशी मोठी अपेक्षा होती. पण २१ चेंडूंचा सामना केल्यानंतर फक्त एक धाव काढून सचिन माघारी परतला, तेव्हा एका बडय़ा इंग्रजी वृत्तपत्राने ‘एण्डुलकर’ अशा आशयाचा मथळा देऊन खळबळ माजवली होती. पण त्यानंतर २०१२पर्यंत हा अश्वमेध अविरत सुरू होता आणि आहे. भारतासाठी ट्वेन्टी-२० न खेळणाऱ्या सचिनने एकदिवसीय क्रिकेटला जरी अलविदा केला असला तरी कसोटी क्रिकेट तो खेळत राहणार आहे. कसोटी क्रिकेटमधील आणखी काही विश्वविक्रम त्याला साद घालत आहेत.