इंग्लंड हा देश फुटबॉल, टेनिस व क्रिकेट आदी खेळांचे माहेरघर असे मानले जाते. असे असूनही या खेळांमध्ये अव्वल स्थान मिळविण्याबाबत इंग्लंडचे खेळाडू कमी पडतात असे दिसून आले आहे. विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठेच्या टेनिस स्पर्धेत घरचे मैदान असूनही अगदी दोन-चार खेळाडूंनाच त्यामध्ये विजेतेपदाच्या सिंहासनावर विराजमान होता आले आहे. फुटबॉलमध्येही असेच चित्र आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. इंग्लंडमधील प्रीमिअर लीग व अन्य आंतरराष्ट्रीय लीग स्पर्धामध्ये खेळण्यासाठी जगातील अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंमध्ये अहमहमिका दिसून येत असते. मात्र या खेळात १९६६चा अपवाद वगळता इंग्लंडला विश्वचषक जिंकता आलेला नाही. इंग्लंडने १९९०मध्ये चौथे स्थान मिळविले आहे. त्याखेरीज आतापर्यंत सहा वेळा उपांत्यपूर्व फेरीत स्थानही मिळवले आहे. मात्र या संधींचे रूपांतर अव्वल कामगिरी करण्यात ते अपयशी ठरले आहेत. युरोपीयन स्पर्धेत त्यांनी एकदा तिसरे स्थान, तर एकदा उपांत्य फेरीत स्थान पटकावले आहे. राऊस चषक स्पर्धेत तीन वेळा ते विजेते ठरले आहेत, तर दोन वेळा त्यांना दुसरे स्थान मिळाले आहे.
इंग्लंडने पात्रता फेरीत समाधानकारक कामगिरी केली. युरोपियन ‘एच’ गटात त्यांच्यापुढे युक्रेन, पोलंड अशा तुल्यबळ संघांचे आव्हान होते. त्यांनी मोल्दोवा व सॅन मरिनोविरुद्धचे सामने सहज जिंकले. मॉन्टेनिग्रोविरुद्धच्या एका सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळविला, मात्र एका लढतीत त्यांना बरोबरी स्वीकारावी लागली. युक्रेनविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्येही त्यांना बरोबरीवरच समाधान मानावे लागले. पोलंडविरुद्धच्या पहिला सामना त्यांनी १-१ असा बरोबरीत ठेवला. पात्रता फेरीतील शेवटच्या सामन्यात त्यांच्यापुढे पुन्हा पोलंडचे आव्हान होते. हा सामनाजिंकणे त्यांच्यासाठी अनिवार्य होते. या लढतीत त्यांचा कर्णधार स्टीव्हन गेरॉर्ड याने शेवटच्या काही मिनिटांमध्ये दोन गोल करीत संघाला विजय मिळवून दिला व याच विजयाच्या आधारे त्यांनी विश्वचषक स्पर्धेचे तिकीट निश्चित केले.
इंग्लंड संघातील अनेक खेळाडू आंतरक्लब स्पर्धामध्ये देदीप्यमान कामगिरी करीत असतात. वेन रुनी, फ्रँक लॅम्पर्ड आदी खेळाडूंसह अनेक खेळाडूंनी व्यावसायिक स्पर्धेतील महागडय़ा खेळाडूंमध्ये स्थान मिळविले आहे. अनेक क्लब इंग्लिश खेळाडूंना आपल्याकडून खेळवण्यासाठी धडपडत असतात. असे असूनही विश्वचषक स्पर्धेत चमक दाखविण्याबाबत त्यांचे खेळाडू कमी पडतात असाच आजपर्यंतचा अनुभव आहे.

इंग्लंड (ड-गट)
*फिफा क्रमवारीतील स्थान : ११
विश्वचषकातील कामगिरी
* सहभाग : १३ वेळा (२०१४सह)
* जेतेपद : १९६६
* चौथे स्थान : १९९०
* उपांत्यपूर्व फेरी : १९५४, १९६२, १९७०, १९८६, २००२, २००६
* दुसरी फेरी : १९८२, १९९८, २०१०
संभाव्य संघ
गोलरक्षक : जो हार्ट, बेन फोस्टर, फ्रेझर फोस्टर, जॉन रुडी. बचाव फळी : ग्लेन जॉन्सन, फिल जोगील्का, गॅरी काहिल, जॉन स्टोन, जॉन फ्लॅनागन, ख्रिस स्मॅझलिंग, लीटन बेन्स, ल्युक शॉ. मधली फळी : स्टीव्हन गेरॉर्ड, जॅक विल्शेर, जॉर्डन हेन्डरसन, फ्रँक लॅम्पर्ड, जेम्स मिल्नेर, राहीम स्टर्लिग, अ‍ॅडम लालेना, टॉम क्लेव्हर्ले, रॉस बार्कले. आघाडीची फळी : वेन रुनी, अँडी कॅरोल, जेर्मन देओफ, डॅनियल स्टुरीज, डॅनी वेलबेक, रिकी लॅम्बर्ट.
* स्टार खेळाडू : वेन रुनी, गॅरी काहिल, स्टीव्हन गेरॉर्ड, रिकी लॅम्बर्ट, फ्रँक लॅम्पर्ड, ग्लेन जॉन्सन.
* व्यूहरचना : ३-३-४-१ किंवा ४-४-२.

*प्रशिक्षक :
रॉय हॉजसन.

बलस्थाने आणि कच्चे दुवे
अनुभवी व युवा खेळाडूंच्या समावेशामुळे हा संघ समतोल आहे. रॉय हॉजसन यांच्यासारख्या अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे व्यूहरचना करण्याबाबत बाजू भक्कम. वेन रुनी, फ्रँक लॅम्पर्ड यांच्यासारख्या नावाजलेल्या खेळाडूंच्या समावेशामुळे धडाकेबाज खेळ करताना अडचण येऊ नये. मधली फळी भक्कम असल्याचा फायदा त्यांना आक्रमक चाली करताना होईल. गोल नोंदविण्यासाठी आवश्यक असलेल्या अचूकतेमध्ये ते कमी पडतात. ऐन मोक्याच्या क्षणी कचखाऊ वृत्ती दिसून येते व साहजिकच सोप्या संधीही दवडल्या जातात. विनाकारण मानसिक दडपण घेत असल्यामुळे शेवटच्या पाच-सहा मिनिटांमध्ये संघाच्या चालींमध्ये विस्कळीतपणा दिसून येतो. सांघिक कौशल्य दाखविण्याबाबत इंग्लंडचे खेळाडू कमी पडतात. मिचेल कॅरिक व अ‍ॅश्ले कोले या अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती जाणवण्याची शक्यता आहे.

अपेक्षित कामगिरी
साखळी गटात इटली, उरुग्वे व कोस्टा रिका यांच्याशी इंग्लंडला खेळावे लागणार आहे. इटली व उरुग्वे हे अतिशय बलवान संघ असले तरी बाद फेरीत स्थान मिळविण्यात इंग्लंडला अडचण येऊ नये. पात्रता फेरीतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे इंग्लंडच्या खेळाडूंचे मनोधैर्य उंचावले आहे. वेन रुनी, फ्रँक लॅम्पर्ड यांच्यासारखे बुजुर्ग खेळाडू कशी कामगिरी करतात यावरच इंग्लंडचे भवितव्य अवलंबून आहे. कोस्टा रिकाविरुद्ध इंग्लंड विजयी होईल अशी अपेक्षा आहे. इटली व उरुग्वे यांच्याविरुद्ध विजय मिळविताना इंग्लंडच्या खेळाडूंना झुंजावे लागणार आहे.

Story img Loader