वृत्तसंस्था, दोहा : पाच वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलला यंदाही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार का मानले जात आहे, याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. ब्राझीलने आपला दर्जा सिद्ध करताना दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करून विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत थाटात प्रवेश केला. पूर्वार्धातील गोल धडाक्यानंतर ब्राझीलने अखेपर्यंत आपले निर्विवाद वर्चस्व राखले.
या सामन्यात ३६व्या मिनिटालाच ब्राझीलकडे ४-० अशी मोठी आघाडी होती. व्हिनिसियस ज्युनियर (सातव्या मिनिटाला), नेयमार (१३व्या मि.), रिचार्लिसन (२९व्या मि.) आणि लुकास पाकेटा (३६व्या मि.) यांनी ब्राझीलला ही आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धात त्यांनी खेळाचा वेग कमी केला. त्यामुळे त्यांना गोलसंख्या वाढवण्यात अपयश आले. त्यातच ७६ व्या मिनिटाला त्यांना गोल स्वीकारावा लागला. गोलकक्षाच्या बाहेरून पैक सेउंग-होच्या किकने ब्राझीलचा गोलरक्षक अॅलिसनला चकवले. उत्तरार्धात कोरियन खेळाडूंनी कामगिरी सुधारली. त्यांनी भक्कम बचाव करताना ब्राझीलच्या आक्रमकांना रोखून धरले होते. मात्र, याचा निकालावर फारसा परिणाम झाला नाही. पूर्वार्धातील ब्राझीलच्या धडाक्याने दडपणाखाली खेळणाऱ्या कोरियाला एक गोल केल्याचा दिलासा मिळाला.
दुखापतीतून सावरलेला नेयमार ब्राझीलसाठी मैदानात उतरला. नेयमारच्या पुनरागमनामुळे ब्राझीलची ताकद वाढली. त्यांच्या अन्य आक्रमकपटूंचा खेळ अधिक बहरला. मध्यंतरालाच ब्राझीलने ४-० अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल जवळपास निश्चित केला. ब्राझीलने लौकिकाला साजेसा आक्रमक आणि कलात्मक खेळ करत विश्वचषक स्पर्धेची रंगत वाढवली.
सामन्याच्या सातव्या मिनिटाला नेयमारच्या साहाय्याने व्हिनिसियसने ब्राझीलचा गोल झपाटा सुरू केला. १३व्या मिनिटाला नेयमारने पेनल्टीवर गोल करत ब्राझीलची आघाडी दुप्पट केली. रिचार्लिसनने २९ व्या मिनिटाला ब्राझीलचा तिसरा गोल केला आणि ३६व्या मिनिटाला पाकेटाने आघाडी चौपट करून ब्राझीलचा दरारा कायम राखला. व्हिनिसियस आणि पाकेटाने केलेले गोल ब्राझीलच्या सांघिक खेळाचा सर्वोत्तम नमुना होता. रिचार्लिसनचा गोल हे त्याचे वैयक्तिक कौशल्य दाखवणारा होता.
- पेलेंच्या (७) विश्वचषक स्पर्धेतील गोलसंख्येची बरोबरी करण्यापासून नेयमार एक गोल दूर आहे.
- विश्वचषकाच्या बाद फेरीत पहिला गोल केल्यानंतर ब्राझीलचा संघ गेल्या नऊ सामन्यांत अपराजित आहे. २०१०मध्ये उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलला नेदरलँड्सविरुद्ध १-२ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
- विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलने दुसऱ्यांदा पहिल्या १३ मिनिटांत दोन गोल केले. यापूर्वी २००२ मध्ये कोस्टा रिकाविरुद्ध अशी कामगिरी त्यांनी केली होती.
- विश्वचषकात २९ मिनिटांत तीन गोल करण्याची ब्राझीलची ही सर्वात वेगवान कामगिरी आहे. यापूर्वी १९५० मध्ये स्पेनविरुद्ध ३१ मिनिटांत त्यांनी तीन गोल केले होते.