Eden Gardens Stadium Dressing Room Fire: बंगाल क्रिकेट असोसिएशन अंतर्गत येणाऱ्या कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. वास्तविक, स्टेडियमच्या ड्रेसिंग रूमला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये अचानक आग लागली. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र या घटनेत ड्रेसिंग रूमचे मोठे नुकसान झाले आहे.
ड्रेसिंग रूममध्ये मोठे नुकसान झाल्याची शक्यता –
स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निशमन विभागाला मध्यरात्री १२ च्या सुमारास स्टेडियमच्या ड्रेसिंग रूममध्ये आग लागल्याचा कॉल आला. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या अपघातात ड्रेसिंग रूमचे फॉल्स सिलिंग पूर्णपणे जळून खाक झाले आहे. यासोबतच तेथे असलेल्या वस्तूही जळून राख झाल्या आहेत.
या स्टेडियममध्ये विश्वचषकाचे होणार आहेत सामने –
ईडन गार्डन्स स्टेडियमवर ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाचे आयोजन करायचे आहे. या स्टेडियमवर पहिला सामना २८ ऑक्टोबर रोजी नेदरलँड आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. या मैदानावर टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. अलीकडेच आयसीसीचे पथक या स्टेडियममध्ये व्यवस्था पाहण्यासाठी आले होते.
आयसीसी असेल चिंतेत –
काही दिवसांपूर्वी बंगाल क्रिकेट असोसिएशनने आयसीसीसमोर पाकिस्तान सामन्याबाबत सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा उपस्थित केला होता. बंगाल क्रिकेट असोसिएशनने पाकिस्तानच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेवर आक्षेप घेतला होता. तो सामना दिवाळीच्या दिवशी होत आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या त्या आक्षेपादरम्यान, आगीच्या या घटनेने आयसीसीचीही चिंता वाढवली असावी.