एपी, हॅम्बर्ग
सातत्याने राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरण्याची खासियत असलेल्या आघाडीपटू वाऊट वेघोर्स्टने पुन्हा एकदा आपला लौकिक दाखवून देत युरो फुटबॉल स्पर्धेत रविवारी नेदरलँड्सला पोलंडविरुद्ध २-१ असा विजय मिळवून दिला.
अचूक पास, चेंडूवरील सर्वाधिक ताबा आणि गोल जाळीच्या दिशेने सर्वाधिक फटके मारुनही नेदरलँड्सला आघाडी घेण्यात अपयश आले. यामध्ये मेम्फिस डीपेने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्यानंतर ८१व्या मिनिटाला मैदानात उतरलेल्या वेघोर्स्टने ८३व्या मिनिटाला गोल करण्याची अचूक संधी साधली आणि नेदरलँड्सचा विजय साकार केला.
पोलंडसारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असूनही नेदरलँड्सने कमालीच्या नियोजनपद्धतीने खेळ करून सामन्यात वर्चस्व राखले. लेवांडोवस्की खेळत नसल्याचा फायदा नेदरलँड्सने पुरेपूर उठवला आणि एका सफाईदार विजयाची नोंद केली. या विजयाने नेदरलँड्सने गेल्या आठ मोठ्या स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकण्याची परंपरा कायम राखली.
हेही वाचा >>>Super8 Explainer: वर्ल्डकपमधील सुपर८चे सामने कसे खेळवले जाणार? काय आहे A1, B2 चं गणित; जाणून घ्या सविस्तर
सामन्याच्या १६व्या मिनिटाला अॅडम बुक्साने शानदार हेडर करत पोलंडला आघाडीवर नेले होते. यावेळी बुक्साने आपल्या ६ फूट ३ इंच उंचीचा पुरेपूर फायदा घेतला. त्यानंतर पूर्वार्धातच कोडी गाकपोने नेदरलँड्सला बरोबरी साधून दिली. पोलंडचा गोलरक्षक वोजिएच स्झेस्नीला गाकपोची किक अडवता आली नाही. एक गोलच्या बरोबरीनंतर सामन्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत झालेल्या संघर्षात सामन्याच्या ८३व्या मिनिटाला दोनच मिनिटांपूर्वी राखीव खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या वेघोर्स्टने नेदरलँड्ससाठी विजयी गोल केला.
अखेरचा प्रयत्न म्हणून नेदरलँड्सच्या प्रशिक्षकांनी वेघोर्स्टला ८१व्या मिनिटाला मैदानात उतरवले. नेदरलँड्सच्या एकेने मुसंडी मारून पोलंडच्या वेघोर्स्टकडे पास दिला. त्याने ही संधी अचूक साधली. वेघोर्स्टने राखीव खेळाडू म्हणून अगदी अखेरच्या क्षणी मैदानावर उतरविल्यावर नेदरलँड्साठी गोल करण्याची भूमिका दुसऱ्यांदा निभावली. यापूर्वी २०२२ विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत वेघोर्स्टने असाच उशिरा अर्जेंटिनाविरुद्ध गोल केला होता. त्यावेळी देखिल वेघोर्स्टने डीपेचीच जागा घेतली होती. यावेळी सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. पेनल्टी शूट आऊटमध्ये मात्र अर्जेंटिनाने बाजी मारली होती.
नेदरलँड्सचे चाहते गोंधळात
सामन्यासाठी हॅम्बर्गला आलेल्या सुमारे ५० हजार नेदरलँड्सच्या चाहत्यांना धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. सेंट पॉली जिल्ह्यात एकत्र जमलेल्या लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोंधळात हे चाहते अडकले होते. मात्र, हा गोंधळ सामन्याशी संबंधित नव्हता असे पोलिसांनी सांगितले. एक व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन नागरिकांना धमकावत होता, त्याला गोळ्या मारून जखमी करण्यात आले असे पोलिस म्हणाले.