पाकिस्तानविरुद्धच्या दुसरी कसोटीत विजयासह श्रीलंकेच्या संघाने शैलीदार फलंदाजीचे प्रतीक असलेल्या महेला जयवर्धनेला निरोप दिला. पाकिस्तानविरुद्धची मालिका आपल्या कारकीर्दीतील अखेरची असल्याचे जयवर्धनेने जाहीर केले होते. ट्वेन्टी-२० प्रकारातून याआधीच निवृत्ती स्वीकारलेला महेला आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. महेलाला अभिवादन करण्यासाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे उपस्थित होते.
सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी महेलाला उचलून घेतले. शेवटची कसोटी खेळणाऱ्या महेलाला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती. नालंदा महाविद्यालयातर्फे महेलाचा सत्कार करण्यात आला. यावेळी महेलाची पत्नी, मुले आणि आई-वडील उपस्थित होते. महेलाने १४९ कसोटी सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना ४९.८४च्या सरासरीने ११,८१४ धावा केल्या. त्याच्या नावावर ३४ शतके आणि ५० अर्धशतकांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही महेलाच्या नावावर आहे. याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये २०५ झेल टिपण्याची किमयाही त्याने केली आहे. कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात १०,००० पेक्षा धावा करणाऱ्या मोजक्या खेळाडूंत महेलाचा समावेश होतो.
कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेला विजयासाठी केवळ तीन विकेट्सची आवश्यकता होती. तासाभरातच पाकिस्तानचा डाव गुंडाळत श्रीलंकेने १०५ धावांनी विजय मिळवला. २७१ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानचा दुसरा डाव १६५ धावांतच आटोपला. सर्फराझ अहमदने सर्वाधिक ५५ धावा केल्या.
श्रीलंकेने रंगना हेराथने ५७ धावांत ५ बळी घेतले. या विजयासह श्रीलंकेने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. सामन्यात १४ बळी घेणाऱ्या रंगना हेराथला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Story img Loader