LPL 2023 Snake disturbance: बी-लव्ह कॅंडीने शनिवारी लंका प्रीमियर लीगच्या १५व्या सामन्यात जाफना किंग्जवर आठ धावांनी सनसनाटी विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना कॅंडीने २० षटकांत ८ बाद १७८ धावा केल्या, मोहम्मद हरीसने ८१ धावांची खेळी केली. मात्र नंतर अँजेलो मॅथ्यूजने तीन विकेट्स घेत जाफनाला १७० धावांपर्यंत रोखले त्यांनी ही धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात केली. या सामन्यात अनेक मोठ्या खेळी खेळल्या गेल्या. पण एक गोष्ट ज्याने संपूर्ण सामान्याला प्रसिद्धी मिळवून दिली ती म्हणजे मैदानात अचानक झालेली सापाची एन्ट्री.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये जाफनाचा संघ धावांचा पाठलाग करताना एक साप मैदानात अचानक घुसताना दिसला. साप हळू हळू पुढे सरकत होता आणि त्याचवेळी कॅंडीचा वेगवान गोलंदाज इसुरु उडाना त्याठिकाणी फिल्डिंग करत होता आणि हे पाहून तो अचानक घाबरला. हे सर्व पाहताच तो गोलंदाज लगेचच दुसरीकडे गेला. त्यानंतर पुन्हा सामना सुरु झाला पण साप अजूनही तिथेच होता. मात्र, सापाने सामन्यात अडथळा आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जुलैमध्ये, गॅले टायटन्स आणि डंबुला ऑरा यांच्यातील LPL २०२३ सामन्यात खेळपट्टीवर अचानक साप आल्याने सामना थांबवण्यात आला होता, ही सामन्याच्या पाचव्या षटकात ही घटना घडली होती.

सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, शनिवारच्या सामन्यात पुनरागमन करताना हॅरिसने ८१ धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त कॅंडीच्या इतर कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा देखील ओलांडता आला नाही. फखर जमान आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी २२ धावा केल्या. जाफना संघाकडून नुवान तुषाराने तीन तर दुनिथ वेललागे आणि दिलशान मदुशंका यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

हेही वाचा: Kuldeep Yadav: “इंडिया में आपसे बडा…” कुलदीपच्या चमकदार कामगिरीमागे ऋषभ अन् पाँटिंगची मोलाचा भूमिका? कसे ते घ्या जाणून

१७९ धावांचा पाठलाग करताना कॅंडीकडून शोएब मलिकने ३२ चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या पण, ते पुरेसे नव्हते. कारण पाठलाग करताना जाफना संघाला आठ धावा कमी पडल्या आणि त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्याच्याशिवाय थिसारा परेराने ३६ तर ख्रिस लिनने २७ धावा केल्या. कॅंडीतर्फे अँजेलो मॅथ्यूजने तीन तर नुवान प्रदीप आणि इसुरु उडाना यांनी अनुक्रमे दोन आणि एक विकेट घेतली.