जर तुम्हाला स्पोर्ट्स कारची आवड असेल आणि तुमच्या खिशात चांगले पैसे असतील, तर भारतीय कर्णधार विराट कोहलीची लॅम्बोर्गिनी कार तुमची होऊ शकते. वास्तविक, विराटने वापरलेली लेम्बोर्गिनी गॅलार्डो स्पायडर कार कोची येथील एका शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या या कारची किंमत १.३५ कोटी रुपये आहे. ही कार ० ते १०० किमीचा वेग फक्त ४ सेकंदात पकडते. ऑटोमोटिव्ह वेबसाइटनुसार, कोहलीने ही कार २०१५ मध्ये खरेदी केली होती.
विराटने ही कार फक्त थोड्या काळासाठी वापरली आणि नंतर ती विकली. कोची स्थित कंपनी ‘रॉयल ड्राइव्ह’ च्या मार्केटिंग मॅनेजरने याची पुष्टी केली, की ही लम्बोर्गिनी कार आता विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आतापर्यंत ती फक्त १० हजार किलोमीटर धावली आहे. कोलकात्यातील एका कार डीलरकडून कोची येथे ही कार आणली आहे.
हेही वाचा – IPL 2021 : विराटनंतर कोण होणार RCBचा नवा कप्तान? ‘या’ तीन खेळाडूंना मिळू शकते सुवर्णसंधी
या कारची टॉप स्पीड ३२४ किमी प्रति तास आहे. यात ५.२ लीटर V१० इंजिन आहे, जे या कारला प्रचंड शक्ती देते. २०१५ मध्ये गॅलर्डोचे शेवटचे मॉडेल समोर आले होते.
विराट कोहलीने नुकतेच आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २०२२मध्ये तो आयपीएलमध्ये कर्णधार नसेल. त्याने एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली. अलीकडेच विराटने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याबद्दल सांगितले होते. यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराट हे कर्णधारपद सोडणार आहे.