Fan saying I love you to MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. भारताचा माजी कर्णधार निवृत्तीनंतर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. जरी तो सोशल मीडियावर क्वचितच सक्रिय असला तरी, चाहत्यांना त्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर पाहायला मिळतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एमएस धोनीचा चाहता त्याला ‘आय लव्ह यू’ म्हणताना दिसत आहे.
हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील आहे. व्हिडीओमध्ये धोनी विमानतळावर सुरक्षा तपासणी करताना दिसत आहे. दरम्यान, चाहता ओरडतो, “माही भाई आय लव्ह यू.” या चाहत्याने माजी भारतीय कर्णधाराला ‘माही भाई आय लव्ह यू’ असे एकदा नाही तर अनेक वेळा म्हटले आहे. त्यानंतर धोनीचा फॅन शेवटी म्हणतो, “माझे हात थरथरत आहेत.” चाहत्यांच्या या हाकेला प्रतिसाद देताना धोनीने एक गोड स्माईल दिली. धोनीचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.
माहीचा नवा लूक –
याआधीही एमएस धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये माही नव्या लूकमध्ये दिसला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, पाच वेळा आयपीएल विजेता कर्णधार पोनीटेल हेअरस्टाइलमध्ये दिसला. व्हिडीओमध्ये धोनी बसमधून उतरत असताना त्याच्यासोबत बॉडीगार्ड होते. टक्कल करण्यापासून ते मोहॉक करण्यापर्यंत, धोनीने गेल्या काही वर्षांत अनेक केशरचना केल्या आहेत. माही शेवटचा आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये खेळताना दिसला होता, जिथे त्याने सीएसकेला पाचव्यांदा विजेतेपद मिळवून दिले.
एमएस धोनीने २००७ मध्ये भारताचे कर्णधारपद स्वीकारले आणि पहिल्याच वर्षी टी-२० विश्वचषक जिंकण्यात यशस्वी ठरला. गंभीर आणि धोनी यांनी मिळून टीम इंडियासाठी आयसीसी विश्वचषक २०११ चे विजेतेपद पटकावले होते. या दोघांनी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार अर्धशतके झळकावली. धोनीने नाबाद ९१ धावा केल्या होत्या, तर गंभीरने ९७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली होती.