अर्जुन तेंडुलकरने रणजी पदार्पणातच उत्कृष्ट शतक झळकावले. गोवा संघाकडून खेळताना त्याने हा पराक्रम केला. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. वास्तविक योगराज सिंग यांनीच अर्जुनला चंदीगडमध्ये प्रशिक्षण दिले होते. आता अर्जुन आणि योगराज सिंग यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोघे भांगडा करताना दिसत आहेत.
योगराज सिंग यांनी काही दिवसांपूर्वी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो अर्जुनसोबत भांगडा करताना दिसत होता. या व्हिडिओत त्यांच्यासोबत इतर खेळाडूही दिसत आहेत. अर्जुन तेंडुलकरच्या शतकानंतर हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अर्जुनला देण्यात आले कडक प्रशिक्षण –
योगराज सिंग यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, अर्जुनने त्यांच्यासोबत २ आठवडे वेळ घालवला होता. अर्जुन पहाटे ५ वाजता उठायचा. २ तास धावल्यानंतर तो जिममध्ये बॉडीवेट व्यायाम करायचा. याशिवाय योगराजने स्वतःची आणि अर्जुनची आणखी एक गोष्ट शेअर केली आहे. ते म्हणाले, ”एकदा सिंगल सराव सामन्यादरम्यान अर्जुनच्या पायाला दुखापत झाली होती. आम्ही पटकन डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी सांगितले की फ्रॅक्चर नाही.’ त्यानंतर अर्जुन मला म्हणाला, ‘सर, मला उभे राहताही येत नाही.’ मी त्याला घाबरू नकोस असे सांगितले. तसेच त्याला म्हणालो, अग्नीच्या नदीत पोहल्याशिवाय तुम्ही कधीच सोने होऊ शकत नाही.”
गोव्यासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रचला विक्रम –
गोव्यासाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या अर्जुनने १७८ चेंडूत शतक पूर्ण केले. या खेळीत त्याने १६ चौकार आणि दोन षटकारही मारले. अर्जुन आणि त्याचा साथीदार सुयश प्रभुदेसाई यांच्यातील शानदार भागीदारीच्या जोरावर गोवा संघाने ४०० धावांचा टप्पा पार केला. गोवा क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळल्या जात असलेल्या सामन्यात प्रभुदेसाईनेही शतक झळकावले. अर्जुन तेंडुलकरने २०७ चेंडूत १२० धावांची शानदार खेळी केली.