Babar Azam warning to throw a bottle at PSL 2024 after fans teased him as Zimbaber : पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमने बॅटने अनेक मोठे पराक्रम केले आहेत. त्याची तुलना भारतीय संघाचा दिग्गज विराट कोहलीसोबत केली जाते. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून बाबर आझम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम पाकिस्तान सुपर लीगमध्येही दिसून आला. बाबरसमोर चाहते ‘झिम्बाबर’च्या घोषणा देताना दिसले. यानंतर डग आऊटमध्ये बसलेला बाबर आझम संतापला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये आतापर्यंत बाबर आझमने शानदार कामगिरी केली आहे. गेल्या ३ डावात त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत. पहिल्या सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळताना बाबरने शानदार ६८ धावा केल्या. यानंतर पुढच्याच सामन्यात त्याने ७२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याचे अर्धशतक हुकले आणि त्याला केवळ ३१ धावा करता आल्या. मात्र असे असतानाही चाहते मैदानात त्याची खिल्ली उडवताना दिसले.
‘झिम्बाबर-झिम्बाबर’च्या घोषणा का दिल्या?
बाबर आझम टेक्निकल टीमच्या बाजूला बसला होता. त्यावेळी काही चाहते त्याच्या मागून ‘झिम्बाबर-झिम्बाबर’च्या घोषणा देताना दिसले. यानंतर बाबर आझमचा संयम सुटला आणि त्याने चाहत्याला आपल्या दिशेने बोलावण्याचा इशारा केला. एवढेच नाही तर बाटली फेकून मारण्याचा इशाराही दिला. बाबर आझमने झिम्बाब्वेविरुद्ध ५७.७५ च्या सरासरीने ६९३ धावा केल्या आहेत, तर मोठ्या संघांविरुद्धच्या सामन्यात तो फ्लॉप ठरला आहे. त्यामुळेच चाहते त्याला ‘झिम्बाबर-झिम्बाबर’ म्हणून ट्रोल करताना दिसत आहेत.
बाबरचे लक्ष टी-२० विश्वचषकावर –
बाबर आझम टी-२० विश्वचषक २०२४ च्या तयारीच्या दृष्टीने उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने शेवटची टी-२० मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळली. बाबर आझमने त्या मालिकेत आपल्या बॅटची ताकद दाखवली. त्याने पहिल्या तीन सामन्यात ५७, ६६, ५८ धावा केल्या होत्या. जूनमध्ये टी-२० वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे, आता मेगा इव्हेंटमध्ये तो कशी कामगिरी करतो, हे पाहावे लागेल.