क्रिकेटची लोकप्रियता अफाट आहे. जगभरात विविध ठिकाणी विविध पातळ्यांवर क्रिकेट हा खेळ खेळला जातो. आपल्या देशात तर क्रिकेटला धर्म मानले जाते. प्रत्येक गावात आणि शहरात ठिकठिकाणी क्रिकेट खेळणारी मुलं तुम्हाला सहज दिसतील. आता जितके जास्त खेळाडू तितक्या जास्त त्यांच्या खेळण्याच्या शैली, हे ओघाने आलेच. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपल्याला प्रत्येक खेळाडू वेगळ्या पद्धतीने खेळताना दिसतो. ही गोष्ट प्रामुख्याने गोलंदाजांच्या बाबतीत प्रकर्षाने जाणवते. लसिथ मलिंगा, पॉल अॅडम्सयांच्यापासून ते जसप्रित बुमराहपर्यंत क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक आउट-ऑफ-द-बॉक्स गोलंदाजी अॅक्शन्स चाहत्यांना बघायला मिळाल्या आहेत. मात्र, या गोलंदाजांच्या वेगळेपणालाही टक्कर देईल, अशा एका गोलंदाजाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. विशेष म्हणजे माजी दिग्गज खेळाडू मायकेल वॉनदेखील त्याचा फॅन झाला आहे.
मोनिक दास नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने सुरुवातीला हा व्हिडिओ ट्विट केला होता. “बुमराह, मलिंगा आणि पाथिराना यांना बाजूला ठेवा. याठिकाणी सर्वांचे एकत्रित व्हर्जन सापडले आहे!!!”, अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काही खेळाडू क्रिकेट खेळताना दिसत आहेत. गोलंदाजी करणारा गोलंदाज एकदम निराळ्यापद्धतीने चेंडू फेकताना दिसत आहे. चेंडू फेकण्यापूर्वी तो भरपूरवेळा आपला हात वरतीच गोल-गोल फिरवताना दिसत आहे. त्याची ही कृती फारच विनोदी वाटत आहे. त्यानंतर चार्ल्स डॅगनॉल या एका फ्रिलान्स समालोचकाने हा व्हिडिओ शेअर केला. इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी त्यावर ‘एकदम योग्य अॅक्शन’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील गोलंदाजाला बघून भारतीय क्रिकेट चाहत्यांना लगान चित्रपटातील ‘गोली’ नावाच्या पात्राची आठवण झाली आहे. आमिर खान अभिनीत ‘लगान’ चित्रपटामध्ये अभिनेता दया शंकर पांडे यांनी गोलीचे पात्र साकारले होते. हा गोली चेंडू हातातून सोडण्यापूर्वी अनेक वेळा हात फिरवताना दिसतो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील गोलंदाज म्हणजे याच ‘गोली’चं रिअल लाइफ व्हर्जन असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
हा व्हिडिओचे ठिकाण आणि त्यातील गोलंदाज कोण आहे याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.