टीम इंडियाचा दिग्गज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. आर्यवीर १६ वर्षाखालील विजय मर्चंट ट्रॉफी २०२२-२३ मध्ये बिहार विरुद्ध खेळताना दिसू शकतो. आर्यवीर सेहवाग हा उजव्या हाताचा फलंदाज आणि उजव्या हाताचा लेग-स्पिनर आहे. अशात आर्यवीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
आर्यवीरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केलेला व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आर्यवीर नेटमध्ये सराव करत असल्याचा दिसतोय. ज्यामध्ये तो थ्रोडाऊनचा सामना करताना दिसत आहे. आर्यवीरने वडील वीरेंद्र सेहवागच्या शैलीत पहिला शॉट लगावला. पायांची थोडीशी हालचाल करत बॅट आणि बॉलचे शानदार संयोजन केले. पुढे व्हिडिओमध्ये तो अनोख्या शैलीत फलंदाजी करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये सेहवागचा दीर्घकाळचा दिल्लीचा सहकारी मिथुन मन्हास देखील दिसत आहे. हा व्हिडिओ २०२२ लीजेंड्स लीग क्रिकेट दरम्यान रेकॉर्ड करण्यात आला आहे, असे म्हटले जात आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये होणाऱ्या या लीगमध्ये सेहवाग गुजरात जायंट्सकडून खेळला होता, तर मिथुन मन्हास सहाय्यक प्रशिक्षक होता.
२०१९ मध्ये एका मुलाखतीत सेहवागने सांगितले होते की, त्याच्या मुलांवर क्रिकेटर होण्यासाठी कोणतेही दडपण नाही. सेहवाग म्हणाला होता, ”मला त्याच्यामध्ये दुसरा वीरेंद्र सेहवाग बघायचा नाही. ते विराट कोहली किंवा हार्दिक पंड्या किंवा एमएस धोनी होऊ शकतात. ते त्यांचे करिअर निवडण्यास मोकळे आहेत. आम्ही त्यांना शक्य तितके, ते साध्य करण्यासाठी मदत करू. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, त्यानी एक चांगला माणूस व्हावे.”
विजय मर्चंट ट्रॉफीसाठी दिल्ली संघ: अर्णव बग्गा (कर्णधार), आर्यवीर सेहवाग, सार्थक रे, प्रणव, सचिन, अनिंदो, श्रेय सेठी (यष्टीरक्षक), प्रियांशू लक्ष्मण, उद्धव मोहन, ध्रुव, किरीट कौशिक, नैतिक माथूर, शंतनू यादव आणि मोहक कुमार.