SA vs WI 2nd T20 Match Updates: दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी रात्री अतिशय रोमांचक सामना झाला. या सामन्यात अनेक विश्वविक्रमही मोडीत निघाले. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत असताना वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने असे काही केले, ज्याचे आज संपूर्ण जग कौतुक करत आहे. खरेतर, क्षेत्ररक्षण करताना पॉवेलने ५ वर्षांच्या बॉल बॉयला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वत:ला दुखापत करुन घेतली.
त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगितले जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित २० षटकात २५८ धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर यजमान संघाने ७ चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या गाठली. टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा धावांचा पाठलाग आहे.
चेंडू सोडून बॉल बॉयला वाचवण्याचा प्रयत्न केला –
पॉवेलसोबत ही घटना दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या तिसऱ्या षटकात घडली. डी कॉकने लाँगऑफच्या दिशेने सुरेख शॉट मारला आणि पॉवेलने त्या चेंडूचा पाठलाग सीमारेषेपर्यंत केला. जेव्हा वेस्ट इंडिजचा कर्णधार चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की एक पाच वर्षांचा बॉल बॉय चेंडू पकडण्यासाठी उभा आहे, त्यानंतर त्याने चेंडू सोडून बॉल बॉयला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामध्ये तो स्वतः सीमेवरील एलईडी स्क्रीन धडकला आणि खाली पडला. या अपघातात पॉवेल जखमी झाल्याने तो बराच वेळ मैदानाबाहेर राहिला होता. त्यानंतर तो पुन्हा एकदा मैदानात उतरला आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
चार्ल्सने गेलचा विक्रम मोडला –
या सामन्यात वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी तुफानी फलंदाजी केली. ब्रेंडन किंग एक धाव काढून बाद झाला. त्यानंतर जॉन्सन चार्ल्स आणि काइल मेयर्स यांनी डाव सांभाळला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी केली. २७ चेंडूत ५१ धावा करून मेयर्स बाद झाला. जॉन्सन चार्ल्सने ३९ चेंडूत शतक पूर्ण केले. वेस्ट इंडिजसाठी टी-२० मध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या प्रकरणात चार्ल्सने दिग्गज ख्रिस गेलला मागे टाकले. गेलने ४७ चेंडूत शतक झळकावले होते.
टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग –
सामन्याबद्दल बोलायचे तर, आतापर्यंत कोणत्याही टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०० धावांचा आकडा पार केला नव्हता, परंतु दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हे घडले. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण ५१७ धावा केल्या, हा टी-२० क्रिकेटमधील विश्वविक्रम आहे.