India Vs New Zealand, Semi Final 2023 Updates: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. त्याचबरोबर टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, जी त्यांनी उपांत्य फेरीतही कायम राखली. या विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित शर्माच्या नावाने घोषणा देताना दिसत आहेत.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकांच्या जोरावर ३९७/४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ केवळ ३२७ धावा करू शकला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट घेतल्या. या सामन्यात त्याने ७ विकेट्स घेत इतिहास रचला. तो भारतासाठी विश्वचषकाच्या एका सामन्यात सर्वाधिक ७ विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्यान ६ विकेट्स घेणाऱ्या आशिष नेहराला मागे टाकले. अशाप्रकारे टीम इंडियाने २०२३ च्या विश्वचषकात सलग १० वा विजय नोंदवला.
विश्वचषक २०२३ फायनलमध्ये पोहोचल्याने चाहते टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माचे कौतुक करताना थकत नाहीत. सध्याच्या विश्वचषकात रोहितने जवळपास प्रत्येक सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, ज्याच्या मदतीने टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली आहे. वास्तविक, भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील शानदार विजयानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये जेव्हा भारतीय संघ विजयानंतर टीम हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा भारतीय चाहते रोहितच्या स्तुतीसाठी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. चाहते म्हणत आहेत की, ‘मुंबई का भाई कौन? रोहित-रोहित.’ आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाचे असणार आहे. भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.