Aakash Chopra Champions Trophy 2025 Semi Final Teams : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील दोन सामने पावसामुळे खेळवण्यात आले नाहीत. यामुळे संघांच्या उपांत्य फेरीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना खूप महत्त्वाचा होता. या सामन्याचा विजेता संघ ब गटातून चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरणार होता. परंतु, पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नही. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १२ षटके झाल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पाऊस व ओल्या खेळपट्टीमुळे सामना खेळवता आला नाही. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. अशा महत्त्वाच्या स्पर्धेतील सामन्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची नाचक्की झाली आहे. तर, अफगाणिस्तान संघाला फटका बसला आहे.

ब गटात उपांत्य फेरीसाठी अफगाणिस्तान, द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या तीन संघांमध्ये चुरस होती. मात्र ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना रद्द झाल्यामुळे अफगाणिस्तानचं उपांत्र फेरीचं तिकीट जवळपास रद्द झालं आहे. ऑस्ट्रेलिया चार गुणांसह पहिल्या स्थानी असून त्यांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं आहे. द. आफ्रिकेचेही अफगाणिस्तानइतकेच म्हणजे तीन गुण असले तरी त्यांचा नेट रनरेट खूप चांगला आहे. शेवटच्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात द. आफ्रिका खूप मोठ्या फरकाने पराभूत झाली तरच त्यांची वाट खडतर होऊ शकते. अन्यथा त्यांचं उपांत्य फेरीचं तिकीट जवळपास निश्चित आहे.

भारत व न्यूझीलंडचं तिकीट पक्कं

दुसऱ्या बाजूला अ गटातून भारत व न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू व क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान हे चार संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचतील, असा अंदाज वर्तवला होता. मात्र त्याचा अंदाज थोडासा चुकल्यामुळे समाजमाध्यमांवर अनेकांनी त्याला प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे आकाश चोप्रा याने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत याबाबत खुलासा केला आहे.

आकाश चोप्रा काय म्हणाला?

आकाश चोप्राने म्हटलं आहे की “मी अंदाज वर्तवला होता की भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व अफगाणिस्तान हे चार संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचतील. मात्र, मी हा अंदाज वर्तवण्याआधी सामन्यांची ठिकाणं एकदा तपासायला हवी होती. तसेच या स्पर्धेतून मलाही एक धडा मिळाला आहे की ऑस्ट्रेलियाला बाजूला सारून विचार करता येणार नाही. हा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार नाही असा अंदाज वर्तवता येणार नाही. मी ज्या संघांबाबत अंदाज वर्तवले होते त्या चारपैकी तीन संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. चारपैकी तीन अंदाज बरोबर ठरले ही देखील चांगली गोष्ट आहे”.

Story img Loader