पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच एसपीएलची तुलना करणारं एक वक्तव्य केलं होतं. पीएसएलच्या रचनेमध्ये बदल करण्यासंदर्भात रमीझ राजा विचार करत आहेत. पकिस्तानमधील या टी-२० लीगचं स्वरुप बदलल्यास फायदा होईल असं रमीझ राजा यांचं मत आहे. सध्याची पद्धत कालबाह्य करुन लिलाव पद्धतीने पीएसएलमध्ये खेळाडूंची विक्री केल्यास त्याचा पीसीबीला आणि स्पर्धेला फायदा होईल असं रमीझ राजा यांचं मत असून असं झाल्यास ही स्पर्धा आयपीएलच्या तोडीची ठरेल असा ठाम विश्वास त्यांना वाटतोय.
नक्की वाचा >> “युवराजांनी हा सगळा पुढाकार…”; IPL ची बस फोडल्यानंतर मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
“आपल्याला आर्थिक आघाड्यांवर आत्मनिर्भर होण्यासाठी स्वत:च्या काही गोष्टी उभाराव्या लागतील. आपल्याकडे सध्या पीएसएल आणि आयसीसीचा निधी सोडून इतर काहीही उत्पनाचं साधन नाहीय. पुढील वर्षीपासूनच्या पीएसएलच्या पद्धतीबद्दल चर्चा सुरु आहे. मला पुढील वर्षीपासून पीएसएलमध्ये लिलाव पद्धत लागू करायची आहे. बाजरपेठेकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. पण आम्ही सर्व संघमालकांसोबत बसून चर्चा करुन आणि निर्णय घेऊ,” असं रमीझ राजा म्हणालेत. तसेच पुढे बोलाताना त्यांनी थेट आयपीएलचा उल्लेख केलाय.
नक्की पाहा >> Video: ‘तो’ पॅव्हेलियनकडे जाताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ टाळ्या वाजवू लागला; काराचीच्या मैदानावर…
“हा सारा पैशाचा खेळ आहे. पाकिस्तानमधील क्रिकेटची अर्थव्यवस्था वाढेल तेव्हा आम्हाला मिळणारा मानही वाढले. आमचा सर्वात मोठा आर्थिक आधार हा पीएसएल आहे. आम्ही पीएसएलमध्ये लिलाव पद्धत सुरु केली, अधिक पैसा आणला तर स्पर्धा आयपीएलच्या तोडीची होईल, मग आपण बघू की पीएसएल सोडून आयपीएल खेळायला कोण जातं,” असा अतिआत्मविश्वास रमीझ राजा यांनी व्यक्त केलाय.
भारताचा माजी समलामीवीर आणि सध्या समालोचक असणाऱ्या आकाश चोप्राने यावरुन रमीज राजा यांना टोला लगावलाय. “पीएसएलमध्ये लिलाव पद्धत सुरु केली तरी कोणत्याही खेळाडूला या लीगसाठी १६ कोटी रुपये मिळणार नाही. बाजारपेठेचा वेग असं होऊ देणार नाही,” असं आकाश चोप्राने म्हटलंय. मागील वर्षी राजस्थान रॉयल्सने दक्षिण आफ्रीकेचा अष्टपैलू खेळाडू क्रिस मॉरिससाठी १६ कोटी रुपये मोजले होते.
नक्की वाचा >> सर्व फॉरमॅटमध्ये हा पाकिस्तानी फलंदाज विराट, रोहितपेक्षाही सरस?; इंग्लंडच्या माजी कर्णधारानेही केलं कौतुक
आकाश चोप्राने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर यासंदर्भात भाष्य केलंय. “लीगचे अधिकार विकले तर पैसे येतात. त्या आधारावर लीगचं मूल्यांकन होतं आणि संघांची किंमत निश्चित केली जाते. त्यानंतर ठराविक रक्कम ठरवून ती खर्च करण्याची मूभा संघाना दिली जाते. हा प्रकार ड्राफ आणि लिलाव दोन्हींमध्ये असतो,” असं चोप्राने म्हटलंय.
पुढे बोलताना, “रमीज भाईंचं म्हणणं आहे की पीएसएलमध्ये लिलाव झाला तर किंमत अधिक मिळेल. मात्र तुम्ही पीएसएलच्या कोणत्याही खेळाडूला १६ कोटींची बोली लागल्याचं पाहिलं नसेल. हे शक्य नाहीय. बाजरपेठेमध्ये किती जोर आहे यावर हे अवलंबून असतं, हे स्पष्टच आहे,” असं चोप्राने लिलावामागील अर्थकारण सांगताना म्हटलंय.
पीएसएलचं २०२२ मधील पर्व मागील महिन्यामध्ये पार पडलं. लाहोरच्या संघाने ही स्पर्धा जिंकली. २६ मार्चपासून आयपीएलच्या यंदाच्या पार्वाला सुरुवात होत असून चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.