Australia Vs Pakistan 3rd Test Match Updates : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. गुरुवारी (४ जानेवारी) तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा बहुतांश वेळ पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाने दोन बाद ११६ धावा केल्या आहेत. पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या होत्या. कांगारू संघ सध्या पहिल्या डावात १९७ धावांनी मागे आहे. या सामन्यात जमाल आणि लाबुशेन यांच्यात एक रंजक गोष्ट पाहायला मिळाली.
वास्तविक, पाकिस्तान पहिल्या डावात ३१३ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावाला सुरुवात केली. यादरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आमेर जमालने विरोधी संघाचा अनुभवी फलंदाज मार्नस लाबुशेनची फिरकी घेतली. लाबुशेन स्ट्राइकवर असताना, जमाल गोलंदाजी करण्यासाठी धावत आला. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की त्यात काय खास आहे. प्रत्येक वेगवान गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावतच येतो पण जेव्हा धावत चेंडू टाकायला आला, तेव्हा जमालच्या हातात त्यावेळी चेंडू नव्हता. जमालची ही कृती पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण क्षणभर अवाक् झाले. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जमालच्या या सामन्यातील कामगिरीबद्दल बोलायचे तर, फलंदाजी करताना, त्याने ९७ चेंडूत ८२ धावांचे जलद खेळी साकारली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून नऊ चौकार आणि चार उत्कृष्ट षटकार आले. गोलंदाजी करताना त्याने आठ षटके गोलंदाजी करताना २६ धावा देत एक विकेट घेतली. पाकिस्तानने पहिल्या डावात केलेल्या ३१३ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात २ गडी गमावून ११६ धावा केल्या आहेत. संघासाठी लॅबुशेन ६६ चेंडूत २३ धावा आणि स्टीव्ह स्मिथ ७ चेंडूत सहा धावा करून नाबाद आहे.
सिडनीतील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. अगोदर खराब हवामानामुळे मैदानात अंधार होता. त्यानंतर जोरदार पाऊस झाला. एकदा खेळ थांबल्यानंतर पुन्हा डावाला सुरूवात झाली नाही. खेळ थांबवण्यात आला तेव्हा स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन नाबाद होते. लाबुशेनने २३ धावा केल्या आहेत. तर, स्मिथ सहा धावा करून नाबाद आहे. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोठी भागीदारी करण्याची जबाबदारी दोन्ही फलंदाजांवर आहे.