Aaron Finch Befitting Reply to Sunil Gavaskar on Comment About Rohit Sharma: भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. येत्या २२ नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरूद्ध मोठा पराभव पत्करावा लागला आहे. या मोठ्या पराभवानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिल्या किंवा दुसऱ्या कसोटीला भारताचा कर्णधार रोहित शर्मा मुकणार असल्याचे म्हटले जात आहे. यानंतर भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी रोहितला संपूर्ण मालिकेत कर्णधारपदावरून हटवले जावे आणि बुमराहला त्याच्या जागी नेतृत्त्वाची जबाबदारी द्यावी आणि रोहितने खेळाडू म्हणून खेळावे असे ते म्हणाले होते. पण यावर आता कांगारू संघाचा माजी कर्णधार आरोन फिंचने त्यांच्या या वक्तव्यावर उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू आरोन फिंचने सुनील गावस्कर यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. गावस्कर म्हणाले होते की, बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी रोहितला आधीच कळवायला हवे की भारत आपल्या कर्णधाराशिवाय पहिली कसोटी खेळू शकणार नाही. अशा स्थितीत गरज भासल्यास बुमराहला पाचही सामन्यांसाठी संघाचा कर्णधार बनवायला हवा. पण फिंचला गावस्करचे म्हणणे अजिबात पटले नाही.
अराउंड द विकेट पॉडकास्टमध्ये बोलत असताना आरोन फिंच म्हणाला की, “मी सुनील गावस्कर यांच्याशी अजिबात सहमत नाही. रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार आहे. पण जर त्याला त्याच्या मुलाच्या जन्मासाठी घरीच राहावे लागले, तर त्याच्यासाठी हा एक सुवर्ण क्षण आहे. अशा स्थितीत त्याने यासाठी नक्कीच तिथे वेळ द्यावा.”
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिली कसोटी खेळणार नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून अहवालांमध्ये समोर येत आहे. यामागचं कारण म्हणजे रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची चर्चा आहे. यामुळेच रोहित शर्मा पहिली कसोटी खेळणार नाहीय. तर उर्वरित ४ कसोटी सामन्यांमध्ये तो कर्णधाराच्या भूमिकेत परतणार आहे. रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे पहिली कसोटी खेळणार नसल्याचे त्याने पूर्वीच बीसीसीआयला सांगितलं आहे, असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले होते.
हेही वाचा – Ranji Trophy: केरळच्या जलाज सक्सेनाने रणजी ट्रॉफीत घडवला इतिहास, आजवर कोणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वेळापत्रक
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी – २२ ते २६ नोव्हेंबर – पर्थ स्टेडियम, पर्थ
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी – ६ ते १० डिसेंबर – ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर – द गाबा, ब्रिस्बेन.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पाचवी कसोटी – ०३ ते ०७ जानेवारी – सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी.