Pakistan Abdul Razzaq Bad Mouthing India: विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवानंतर अब्दुल रझाकने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध पुन्हा गरळ ओकली आहे. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू, रझाकने यापूर्वी देखील बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याने तो चर्चेत आला होता. तर यावेळी त्याने असे भारताच्या पराभवाबाबत विचित्र आरोप केले आहेत. भारत जिंकण्यासाठी पात्रही नव्हता असा सूर रझाकने लावला आहे.
पाकिस्तानी टीव्ही शो ‘हसना मना है’ मध्ये सहभागी झालेला अब्दुल रझाक म्हणाला की, “भारतीयांचा अतिआत्मविश्वास होता. पण अंतिम सामन्यात क्रिकेट जिंकले आहे आणि भारत हरला आहे. जर भारताने विश्वचषक जिंकला असता, तर तो खेळासाठी खूप दु:खद क्षण ठरला असता. त्यांनी परिस्थितीचा त्यांच्या फायद्यासाठी वापर केला. मी कोणत्याही आयसीसी स्पर्धांसाठी विशेषतः अंतिम फेरीसाठी इतकी वाईट खेळपट्टी पाहिली नाही. भारत हरला हे क्रिकेटसाठी चांगलेच आहे,”
रझाकने आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी दोन्ही उपांत्य फेरीच्या सामन्यांचे उदाहरण सुद्धा दिले. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना हा उच्च धावसंख्येचा ठरला आणि जवळपास ७०० धावा झाल्या, तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलसाठी वापरण्यात आलेला पृष्ठभाग या दोन्ही सामन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा होता.
रझाक पुढे म्हणाला की, भारताने परिस्थिती आपल्या बाजूने फिरवण्याचा इतका प्रयत्न केला की विश्वचषक सोडा, ते काहीही जिंकण्यास पात्र नाही.”भारत जिंकला असता तर आम्हाला खूप वाईट वाटले असते, एका उपांत्य फेरीत त्यांनी ४०० धावा केल्या, तर दुसऱ्या संघाने ३५० धावा केल्या. दुसऱ्या उपांत्य फेरीत २२० – २३० धावा झाल्या. त्यानंतर अंतिम फेरीत २४० धावा झाल्या. म्हणजे काहीतरी गडबड आहे खेळपट्ट्या आणि वातावरण सर्व संघांसाठी सारखेच असले पाहिजे. अंतिम फेरीतही भारताचा असाच प्लॅन होता कोहलीने जर आज १०० धावा केल्या असत्या तर कदाचित भारत विश्वचषक जिंकलाही असता.
हे ही वाचा<< “ऑस्ट्रेलियाने फसवलं, मिड इनिंगला..”, आर.आश्विनचा थक्क करणारा खुलासा! म्हणाला, “त्यांच्या मुख्य निवडकर्त्यांनी..”
दरम्यान विश्वचषकाच्या उपांत्य फेरीआधी भारतावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी सुद्धा ताशेरे ओढले होते. पण मुळात जरी खेळपट्टी चांगली वाईट असती तरी दोन्ही संघांना एकाच ठिकाणी खेळायचं होतं. मिड इनिंगमध्ये खेळपट्टीत बदल केलेले नव्हते असे म्हणत भारतीय माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी यापूर्वीच सडेतोड उत्तर दिले होते. शिवाय ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड दोन्ही संघांकडून सुद्धा याबाबत काहीच आक्षेप घेण्यात आला नव्हता त्यामुळेच रझाक यांचे विचित्र आरोप हे हास्यस्पद आहेत अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांमध्ये उमटत आहे.